गोंदिया: शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या भेटीसाठी नागपुरात गेलेल्या शिक्षिकेच्या घरून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ६९ हजार रूपयांचे दागिने व रोख रक्कम पळविली. ही घटना १७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान घडली. आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षिका पल्लवी राधेश्याम बिसेन (४२, रा. प्रज्ञा कॉलनी लांजी रोड, आमगाव) या १७ फेब्रुवारी रोजी मुलीची प्रकृती बरी नसल्यामुळे घराला कुलूप लावून नागपूर येथे गेल्या होत्या. परंतु त्या नागपूरला असतांना घरी चोरी झाल्याची माहिती त्यांना मिळाली. परत आल्यावर बघितले असता त्यांच्या घरातून एक लाख रूपये रोख व सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २ लाख ६८ हजार ७०० रूपयाचा ऐवज चोरांनी पळविल्याचे निदर्शनास आले.
यात दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र किंमत ६० हजार, १८ ग्रॅम ६०० मिली वजनाची सोन्याची साखळी किंमत ६० हजार, ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके किंमत २० हजार, ८ ग्रॅम ४०० मिली वजनाचे सोन्याचे पेंडल किंमत २० हजार, १० तोळे वजनाचे चांदीचे पैंजण किंमत ७ हजार ५०० रूपये, तीन नग चांदीच्या साखळी किंमत १२०० रूपये व एक लाख रूपये रोख आहेत. तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.