प्रकरण विद्यार्थिनीवर अत्याचाराचे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालमोहाडी : नानाविध आमिषे दाखवून एका शिक्षकाने त्याच्याच वर्गातील एका मुलीचे दोन वर्षे शारिरीक शोषण केले. ही बाब त्या मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने याप्रकरणाची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी सदर शिक्षकाला १० वर्षांचा कारावास तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.सरस्वती विद्यालय जांभोरा ता.मोहाडी येथे कार्यरत शिक्षक हेमराज बाळकृष्ण मेश्राम (४४) याने त्याच शाळेत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला नानाविध आमिष देत तिच्या घरी जायचा. मुलीचे शिक्षक घरी येतात म्हणून या मुलीची आई या शिक्षकांचा सन्मान करायची. परंतु तुमची मुलगी त्या शिक्षकांसोबत फिरत असल्याची माहिती तिच्या आईला गावातून ऐकू आली. त्यानंतर तिने मुलीला विचारले असता त्या शिक्षकांशी माझे काही संबंध नसल्याची मुलगी सांगत होती. मात्र याप्रकरणी आईला संशय आल्याने तिच्या आईने तिला जांभोरा शाळेतून काढून करडी जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात नाव दाखल केले. जुलै २०१४ मध्ये दुपारच्या सुमारास शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलवर संपर्क साधून तुमची मुलगी शाळेतून निघून गेल्याचे सांगितले. दरम्यान ६ मे २०१५ रोजी घरी कुणालाही न सांगता ती निघून गेली. यादरम्यान तिचा तीन दिवस शोध घेतला असता कुटुंबीयांना ती कुठेही आढळून आली नाही. ९ मे रोजी ती नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. तिथून तिला आणल्यानंतर विचारणा केली असता तिने जांभोरा शाळेचे शिक्षक हेमराज मेश्राम यांच्यासोबत साकोली येथील एका लॉजवर थांबली असल्याचे सांगितले.हेमराजने प्रेम असल्याचे सांगत पैसे व भेटवस्तु देत होता. एप्रिल २०१३ ते मे २०१५ या दोन वर्षाच्या कालावधीत त्याने अनेकवेळा अत्याचार केल्याचे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर या कुटुंबीयांने मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (२), (फ) (आय), (एन) सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी पुराव्यानिशी जिल्हा न्यायालय दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी याप्रकरणात १० जणांची साक्ष तपासली. यात हेमराज मेश्राम हे दोषी सिद्ध झाल्याने त्यांना १० वर्षाचा कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.सुषमा सिंग यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा
By admin | Published: July 01, 2016 1:53 AM