गोंदिया : तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी जनार्धन राऊत यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. राऊत यांनी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव जि.प. गोंदिया येथे अविलंब पाठविण्यात यावे, १ नोव्हेंबर २००५ पासून आतापर्यंत झालेल्या डी.सी.पी.एस. योजनेतील खात्याचे वितरण (कर्मचारी अंशदान, शासन अंशदान, व्याज) वार्षिक पद्धतीने शासन निर्णय ७ जुलै २००७ मधील पद्धतीनुसार देण्यात यावे, जी.पी.एफ. व डी.सी.पी.एस. हफ्त्यांची नोंद करून पावती देण्यात यावी, शिक्षकांचे नामनिर्देशन फॉर्म लवकर गोळा करून त्यांनी दिलेल्या वारसदारांच्या नावाची नोंद सर्व्हिस बुकमध्ये घेणे, शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे परवानगी अर्ज व कार्योत्तर परवानगी अर्ज जि.प. गोंदिया येथे अविलंब पाठविण्यात यावे, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी, शिक्षकांचे थकीत वैद्यकीय बिल व अर्जित रजेचे बिल त्वरित काढण्यात यावे, दरवर्षी गोपनीय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्यात यावी, पगार बिलामध्ये डी.सी.पी.एस. कपातीचे शेड्यूल लावण्यात यावे, शिक्षकांची पदनिहाय रिक्त व अतिरिक्त संख्या याविषयी माहिती द्यावी, भारताचे संविधान उद्देशिका छायांकित फोटो प्रत्येक शाळा कार्यालयात लावण्यात यावे, शाळेचे विद्युत बिल चालू वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतने भरणे, पुरोगामी महाराष्ट्रात चालत आलेली धोरणे राबविण्यात यावी व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान करण्यात यावे. हिंदी-मराठी सुट, संगणक सुट, जात वैधतेची नोंद करणे, शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संजय उके, सरचिटणीस वीरेंद्र भोवते, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, राजेश गजभिये, रोशन गजभिये, किशोर डोंगरवार, उमा गजभिये, अजित रामटेके, अविनाश गणवीर, सचिन धोपेकर, पृथ्वीराज टेंभुर्णीकर, संजय भावे, अंकुश मेश्राम, अजय शहारे, अमित गडपायले, उत्क्रांत उके, प्रदीप रंगारी व लिपिक नायडू उपस्थित होते.