गोंदिया : जिल्हास्थळी शिक्षक भवनाची निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने कार्यकारी अध्यक्ष नानन बिसेन यांच्या नेतृत्वात पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन दिले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शैक्षणिक व सामाजिक विचारांची देवाणघेवाण करून समाजोपयोगी नवनवीन संकल्पना साकारण्याच्या व्यवस्थेसाठी जिल्हास्थळी वास्तू असावी, त्यासाठी शिक्षक भवनाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सदर शिक्षक भवन तयार झाले तर शिक्षक-विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर आयोजनासाठीसुद्धा सदर भवनाचा उपयोग होईल. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांना वेळप्रसंगी निवासासाठी शिक्षक भवनाचा लाभ होऊ शकेल. यासह जिल्हा व राज्यस्तरावरच्या शिक्षकांच्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. या वेळी ना. बडोले यांनी जिल्हास्थळी शिक्षक भवनासाठी व शिक्षकांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रामुख्याने नानन बिसेन, आनंद पुंजे, डी.टी. कावळे, एस.यू. वंजारी, अजय चौरे, प्रकाश कुंभारे, आर.एन. घारपिंडे, के.आर. कापसे, जे.पी. कुरंजेकर, डी.एम. दखणे, निर्मला नेवारे, करूणा मानकर, आर.एस. मेंढे, अशोक तावाडे, एम.डी. फड, टी.एन. केदार, एच.डी. उके, टी.आर. बिसेन, आर.वाय. मचाडे तसेच विदर्भ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्षक्ष रेशीम कापगते, प्राचार्य खुशाल कटरे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांना शिक्षक संघाचे निवेदन
By admin | Published: January 07, 2017 2:05 AM