नवेगावबांध : शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशात दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त यावर्षी शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो, तसेच विद्यार्थीदेखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करीत असतात. सद्य:स्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरू करता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘थँक अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा यासाठी शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे.
....
विद्यार्थ्यांचा गाैरव
या अंतर्गत शाळांनी कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर अपलोड करावयाचे आहेत. यामधील सर्वोत्तम कार्यक्रमांपैकी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
-----------------
असे आहे स्पर्धांचे नियोजन
इयत्ता १ ते ५ वी साठी माझा आवडता शिक्षक, शिक्षक दिन, मी शिक्षक झालो तर-मी शिक्षिका झाले तर या विषयांवर वक्तृत्व, चित्र रेखाटन, काव्य वाचन निबंध स्पर्धा घेतली जाणार आहे. इयत्ता ६ ते ८ वीसाठी माझा शिक्षक-माझा प्रेरक, कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका, माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान, उपक्रमशील शिक्षक या विषयांवर निबंध लेखन, वक्तृत्व, स्वरचित कविता लेखन व काव्यवाचन स्पर्धा घेतली जाणार आहे. इयत्ता ९ ते १२ वीसाठी आधुनिक काळात शिक्षकांची बदललेली भूमिका, देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान, शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम व माझ्या शिक्षकांचा नावीन्यपूर्ण उपक्रम या विषयांवर निबंध लेखन, वक्तृत्व, शिक्षकांची मुलाखत, काव्य लेखन, काव्य वाचन स्पर्धा घेतली जाणार आहे.