गोंदिया : जिल्हा परिषद शाळांवर रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकांची पदे भरण्यासाठी जिल्हाभरातील बी.एड्. पदवीधारक शिक्षकांची कार्यशाळा मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. परंतू कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ही सभा वांझोटी ठरली.पदवीधर शिक्षकांची जवळपास १९७ पदे रिक्त आहेत. जिल्हाभरातील विविध जि.प.शाळांवर कार्यरत असलेल्या बी.एड्. पदवीधारक प्राथमिक शिक्षकांमधून ही पदे भरण्यासाठी आणि कोणत्या शिक्षकाला कोणती शाळा हवी हे जाणून घेऊन समुपदेशनाद्वारे ही पदे या कार्यशाळेत भरली जाणार होती. यासाठी प्रोजेक्टरच्या सहाय्याने स्क्रिनवर तालुका आणि त्यातील रिक्त पदे असलेल्या शाळांची नावे डिस्प्लेद्वारे दाखविली जाणार होती. त्यानुसार शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना प्रथम संधी देऊन तिथेच त्यांना शाळा देणे अपेक्षित होते. यापूर्वी झालेल्या कार्यशाळेत त्याच पद्धतीने पदांचे समायोजन करण्यात आले होते. परंतू यावेळी डिस्प्ले न दाखविता सरळ कोणत्या तालुक्यात किती पदे रिक्त आहेत हे सांगून सर्व शिक्षकांना पसंतीक्रमानुसार तीन शाळांची नावे मागितली. त्यानुसार तुम्हाला कोणती शाळा मिळाली हे नंतर कळवू असे सांगून शिक्षकांना घरी पाठविण्यात आले. यामुळे शिक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला.सकाळी ११ वाजतापासून कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या शिक्षकांचा रात्री ८ वाजतापर्यंत यासंबंधी गोंधळ सुरू होता. डिस्प्लेद्वारे शाळांची माहिती देऊन समुपदेशनाद्वारे ही पदे तत्काळ भरली जावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. या कार्यशाळेला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जी.एन.पाटील, प्रभारी उपशिक्षणाधिकारी शिरसाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
ठोस निर्णय न होताच गुंडाळली शिक्षकांची कार्यशाळा
By admin | Published: August 20, 2014 11:36 PM