बाराभाटी : भारत सरकारची शिष्यवृत्ती ही सगळ्याच प्रकारे मिळते, परंतु त्याचे अर्ज आॅनलाईन सादर करावे लागतात. हे आॅनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना, कर्मचारी वर्गांला तसेच शालेय कर्मचारी वर्गाला खूपच त्रास सहन करावा लागत आहे. सदर शिष्यवृत्ती विभागाची वेबसाईट बऱ्याच वेळा तांत्रिक प्रणालीची अडचण दाखवत असते. या कारणामुळे अर्ज आॅनलाईन करण्यासाठी कर्मचारी खूप त्रासले आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती विभागाने याबाबत कोणतीच दखल न घेता ही तांत्रिक प्रणालीची अडचण दूर करून ही प्रक्रिया सुकर केली नाही. या विभागाची वेबसाईट कधीच सुरळीत चालत नाही. ती सुरळीत चालावी आणि आपले आवेदनपत्र समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात समाविष्ट व्हावे यासाठी शालेय कर्मचारी दिवस सोडून रात्रीसुध्दा आॅनलाईन आवेदन पत्र भरताना दिसतात. तरीसुध्दा या विभागाचा हा भोंगळ कारभार सुरूच आहे. या बाबतीत शालेय विद्यार्थी, कर्मचारी यांनी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले मंत्री यांच्याकडेही तक्रार केली. पण या विभागाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. २०१४-१५ या वर्षाची एससी प्रवर्गाची शिष्यवृत्ती अजूनपर्यंत अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयाकडे मिळालेली नाही. समाज कल्याण विभागाला बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी भेट दिली, आयुक्तांशी चर्चा झाली परंतु समस्या सुटायला मार्ग नाही. आता तर शालेय सत्राचे अर्धे वर्ष संपले आहे. शिष्यवृत्ती अर्जाचे परिपूर्ण आवेदन पत्र भरणे काही विद्यालयाचे, कनिष्ठ महाविद्यालयांना शक्यच झाले नाही. दिवाळीनंतर शाळा तसेच विद्यालये सुरू झाली. उर्वरीत आवेदन पत्र भरण्यासाठी या विभागाच्या वेबसाईटवर शिष्यवृत्तीची कामे पूर्ण करण्यासाठी गेल्यावर याचा ओटीपी क्रमांक चालत नाही, पासवर्ड चालत नाही, म्हणून समोरील कार्य होवू शकत नाही अशी अडचण दाखविली जात आहे. ही एक मोठी समस्या कर्मचारी वर्गासमोर उभी आहे. या सर्व बाबी गांभिर्याने घेऊन समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीच्या येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी शाळा विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयाचे कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)
शिष्यवृत्ती विभागात तांत्रिक गोंधळ
By admin | Published: November 27, 2015 2:05 AM