काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या लोधीटोला येथील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम नागपुरे हे तिरोडा कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेती करून भरपूर उत्पन्न काढत आहेत. नऊ वर्षापासून संपूर्ण शेती श्री पद्धतीने लागवड करीत आहेत. नोकरीपेक्षा शेती परवडण्यासारखी असल्याचे त्यांनी ठामपणे शेतकऱ्यांना सांगितले आहे. लोधीटोला येथील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम नागपुरे यांनी सांगितले की, तिरोडा कृषी विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, प्रशिक्षण व प्रत्यक्ष जावून मार्गदर्शन घेवून शेती करीत असल्याने आपल्याला शेतीतून भरपूर लाभ मिळतो. ‘राबेल त्याची शेती’ असेही ते म्हणाले. आपण सन २००५ पासून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने श्री पद्धतीने धानाची लागवड करीत असून दीड पटीने उत्पन्नात वाढ होताना दिसून आले आहे. यावर्षी १७ एकर शेतात श्री पद्धतीने लागवड केली असून कृषी सहायिका नूतन पानतावने यांनी वेळोवेळी शेतात भेटी देवून मार्गदर्शन केल्याचे सांगितले. श्री पद्धतीतून एकरी २८ ते ३५ क्विंटल (४० त९ी ४५ पोती) धानाचे उत्पन्न मिळते, असेही त्यांनी सांगितले. धानाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने खोल नांगरणी करावी, धसकटे व काडीकचरा जाळणे, बियाणे बीजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपे तयार करून लावणे, त्याचबरोबर रोवणी करण्यापूर्वी चिखलावर झिंक सल्फेट घालून २५ बाय २५ सेमी अंतरावर रोपांची लागवड करावी. तसेच गिरीपुष्पाची पाने व फांद्या तोडून चिखलात टाकल्याने नत्राची मात्रा अधिक प्रमाणात मिळते. नियंत्रित रोपांची लागवड करून निंदन व खताची योग्य मात्रा देवून काळजी घेतली तर उत्पन्न भरपूर मिळू शकते, असा सल्ला राधेश्याम नागपुरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. आपण परंपरागत शेती पद्धतीला बगल देवून आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याने आपल्याला समाधान वाटत असून त्यासाठी कृषी सहायिका नूतन पानतावने यांचे सहकार्य व मार्गदर्शन मोलाचे ठरल्याने ते म्हणाले. धानाच्या शेतीसोबत तांत्रिक मार्गदर्शनातून हरभरा, गहू, भाजीपाला, वांगी, टमाटर, मिरची यासारख्या पिकांचे उत्त्पन्न घेतल्या जात आहे. तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले, कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या भेटी व मार्गदर्शनातून शेतात सुधारणा करण्याची संधी मिळाली, असे शेतकरी नागपुरे यांनी सांगितले.
लोधीटोल्यात तांत्रिक पद्धतीने शेती
By admin | Published: July 21, 2014 11:56 PM