नायब तहसीलदारांची चारही पदे रिक्त : कारभार खाजगी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर देवरी : राज्य सरकार ‘आपलं सरकार’ सांगत विविध योजना राजस्व विभागाच्या माध्यमातून राबवित आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तालुक्यातील येथील तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या चारही पदांसह येथील तब्बल १६ पदे रिक्त पडून आहेत. त्यामुळे कार्यालयाचा कारभार खाजगी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर असून सरकारच्या योजना जनतेपर्यंत कशा पोहचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या बहुतांश योजना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे विविध योजनेतील लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयाशी संबंध येतो. विविध विभागातील विविध योजनांचा लाभ घेणारे व अन्य कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्यांना मात्र आता आल्या पावली परत जाण्याची पाळी आली आहे. कारण येथील तहसील कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. कार्यालयातील महत्वाचे नायब तहसीलदारांचे चारही पद मागील चार महिन्यांपासून रिक्त पडून आहेत. अशात सर्वच कामांचा बोजा तहसीलदार संजय नागतिळक यांच्यावर आला आहे. लोकांच्या कामात अडचणी येवू नयेत यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसावे लागत आहे. मात्र कार्यालयातील १६ पदे रिक्त पडून असल्याने कामाचा व्याप वाढला आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. चार महिन्यांपूर्वी दोन ना. तहसीलदार सेवानिवृत्त होवून दोघांचे स्थानांतरण झाले. त्यामुळे मग्रारोहयो, संजय गांधी निराधार, शाळकरी मुलांचे महत्वाचे प्रमाणपत्र या सर्व कामांकडे तहसीलदार कसे काय लक्ष घालणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने गौण खनिजाचा व्यापार सर्रास सुरू आहे. मनुष्यबळ कमी असल्याने यावर नियंत्रण घालण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. याबाबत तहसीलदार नागतिळक यांना विचारले असता त्यांनी, रिक्त पदे भरण्याकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असल्याचे सांगीतले. अशात आता तरी अधिकारी व जनप्रतिनिधी जातीने लक्ष घालून रिक्त पदे भरणार काय असा सवाल तालुकावासी करीत आहेत.
तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Published: March 05, 2017 12:16 AM