गोंदिया : यंदा हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज वांरवार खोटे ठरले. ऑगस्ट महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये ३७ टक्केच पाणीसाठा आहे. ऑगस्ट नंतर पाऊस कमी होतो. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५४.४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे केलेली धानाची रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आली असल्याने पावसाअभावी शेतकऱ्यांना पिके गमाविण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. त्यामुळेच सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ८७ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मिमी पाऊस पडतो. तर १ जून ते १६ ऑगस्ट या कालावधीत ८२१.३ मिमी पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत या कालावधीत ६३९.६ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ७७.१९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद आमगाव तालुक्यात ३९ टक्केच पाऊस झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाळण्याच्या मार्गावर रोवणीना आता संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट थोडे दूर झाले असले तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
.............
कोट ‘
जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के राेवण्या आटोपल्या आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिकांवरील संकट टळले आहे.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
..............
जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस : ८२१.३ मिमी
आतापर्यंत झालेला पाऊस : ६३९.६ मिमी
..............
पाणीसाठा २० टक्के
लघू प्रकल्प : १९.६७
मध्यम प्रकल्प : १९.६०
मोठे प्रकल्प : २१.१२
.......................
तूर्तास संकट टळले
धान : १ लाख ६७ हजार हेक्टर
तूर : ७ हजार हेक्टर
ज्वारी : ५०० एकर
ऊस : ७०० हेक्टर
इतर पिके : २५०० हेक्टर
.............................
कोट
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे रोवणी वाळण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे यंदा पीक गमावावे लागते काय अशी चिंता सतावत होती. मात्र सोमवारी झालेल्या पावसामुळे रोवणींना संजीवनी मिळाली आहे.
- अविनाश काशीवार, शेतकरी.
......
यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. पण सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने हवामान विभागाचे अंदाज खोटा ठरला तर शेतकऱ्यांवर पिके गमविण्याची पाळी आली. पण सोमवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
-देविदास अंबुले, शेतकरी.