लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच मान्सूनदेखील महाराष्ट्रात वेळेत दाखल हाेईल असे संकेत दिले होते. मात्र, यंदा सुरुवातीपासून अंदाज चुकत आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे टाकलेल्या पऱ्ह्यांना थोडी संजीवनी मिळत आहे; पण पावसाच्या अनियमिततने बळिराजाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे साकडे घालत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपात धानाची लागवड केली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे आता रोवणीयोग्य होत असून, त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात १ ते ३० जूपर्यंत १९२.८ मिमी पाऊस पडतो, तर यंदा या कालावधीत २०८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. यंदा पाऊस सलग होत नसल्याने नदी, नाले, तलाव अजूनही कोरडे पडले असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर सुरुवातीपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणे साहजिक आहे. मात्र, हवामान विभागाने ८ जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कालावधी चांगला पाऊस झाल्यास रोवणी करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र, पावसाने दगा दिल्यास व पंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दुबार पेरणीचे संकट नाही मागील आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, रोवणीची कामे खोळंबली आहेत. पाऊस अधृूनमधून जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे पऱ्ह्यांना संजीवनी मिळत आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते पाणी करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकून झाले आहे. आपल्या भागात जुलैनंतरच दमदार पावसाला सुरुवात होते. त्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही. - गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
देव अशी परीक्षा दरवर्षी घेतो मागील दोन-तीन वर्षांपासून कधी ओल्या, तर कधी दुष्काळाला तोंड देत आहे. यंदादेखील हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आताच पाऊस दगा देत असल्याने पुढे काय अशी चिंता सतावत आहे. - राहुल बिसेन, शेतकरीवातावरणातील बदलाचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनियमित पावसामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेती आता बेभरवशाची झाली आहे. - मनोज दमाहे, शेतकरी.