गोंदिया : आठवड्याभरापासून उन्ह चांगलेच तापू लागले असून पारा दिवसेंदिवस चढताना दिसत आहे. अशातच गुरूवारी (दि.२०) जिल्ह्याचा पारा ४३.५ अंश सेल्सीअसवर पोहचला होता. सातत्याने वाढत चाललेल्या या उकाड्यामुळे जिल्हावासी आता चांगलेच त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, गुरूवारी चंद्रपूरला मागे टाकत ब्रम्हपूरी जिल्हा पुढे गेला असून सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद घेण्यात आली. यामुळे ब्रम्हपूरी जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर असतानाच गोंदिया जिल्हा ४३.५ अंशावर असल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर होता. यावरून आता उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. उन्हाचा भडका बघता शहरातील रस्त्यांवर आता दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे. याशिवाय, आरोग्य विभागाने दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.अतिउष्ण लाटेचा इशारा
- उन्हाच्या तडाख्याने विदर्भ चांगलाच भाजून निघत असतानाच विदर्भात आता अति उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो. मात्र आता गोंदिया जिल्हयाचे तापमानही सातत्याने वाढत असून अतिउष्ण लाटेत गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे.गोंदियाला यलो अलर्ट
- मागील काही दिवसांपासून हवामान खात्याकडून जिल्हयाला यलो अलर्ट दिला जात असला तरी पाऊस काही बरसलेला नाही. असे असतानाच हवामान खात्याने गुरूवार व शुक्रवारी परत एकदा येलो अलर्ट दिला. वृत्त लिहेपर्यंत जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती व गोंदिया शहरात कडक उन्ह तापले होते. अशात आता शुक्रवारी काय होते हे बघता येईल.