गोंदिया : जिल्ह्यातील तापमानाची घट सातत्याने सुरूच असून यामुळे जिल्हावासीयांना आता हुडहुडीच भरली आहे. शनिवारी जिल्हा विदर्भात सर्वाधिक थंड असतानाच रविवारीही (दि.१९) तापमान घटले असून जिल्हा पहिल्या क्रमांकावर ठाम आहे.
रविवारी जिल्ह्याचे तापमान ११.५ अंश सेल्सिअसवर आले आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात झाल्याचे दिसत असून जिल्हावासी गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
यंदा हिवाळा सुरू होऊनही आतापर्यंत थंडी जाणवत नव्हती. मात्र, आता मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट होत असून, जिल्ह्यात थंडीचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, थंडीच्या वाढत्या जोरामुळे कमाल व किमान तापमानातही घट होत असून, त्यात थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात शीतलहर जोर धरताना दिसत आहे. शनिवारी (दि.१८) जिल्ह्याचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर आले असतानाच किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. तर रविवारीही (दि.१९) तापमान घटले असून किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसवर आले. यामुळे आता जिल्हावासीयांना हिवाळ्याचा आनंद येत आहे.
एकही जिल्हा ११ अंशात नाही.
शनिवारी जिल्हा १२ अंश सेल्सिअसवर आल्याने विदर्भात प्रथम क्रमांकावर होता. त्यात आता रविवारी तापमानात आणखी घट झाली असून जिल्हा ११.५ अंश सेल्सिअसवर आला असून पुन्हा प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर बुलडाणा जिल्हा १२.२ अंश सेल्सिअसने होता. विशेष म्हणजे, विदर्भातील अन्य एकही जिल्हा ११ अंश सेल्सिअसच्या घरात नव्हता.