गोंदिया : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात चढउतार सुरू असून सोमवारी (दि.२४) पारा पडून गोंदियाचे किमान तापमान १३.० सेल्सिअसवर आले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. २५) पारा आणखी पडला असून किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअसवर आले. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून थंडीची लाट येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने अवघे वातावरण ढवळून काढले आहे. पावसामुळे थंडीचा जोर वाढतानाच बदलत्या वातावरणामुळे घराघरांत सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण निघत आहेत. यामुळे आता पाऊस व या थंडीपासून एकदाची सुटका व्हावी अशीच जिल्हावासीयांची इच्छा दिसून येत आहे. मध्यंतरी पावसाने उघाड दिल्याने थंडीचा जोर कमी झाला होता व पारा चढताना दिसत होता. मात्र मागील २-३ दिवसांपासून पुन्हा एकदा पारा पडताना दिसत आहे.
सोमवारी (दि. २४) जिल्ह्याचा पारा पडला व कमाल तापमान २४.५ अंश, तर किमान तापमान १३.० अंश सेल्सिअवर आले होते. त्यानंतर आता मंगळवारी (दि. २५) पारा आणखी पडला असून कमाल तापमान २४.५ अंश तर किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअसवर आले होते. पारा पडताच पु्न्हा एकदा थंडीचा जोर वाढला व नागरिकांना गरम कपड्यांपासून सुटका मिळाली नाही. थंडीमुळे आता ताप, सर्दी, खोकला बळावल्याने लवकरात लवकर थंडीपासून सुटका मिळावी, असे जिल्हावासीयांना वाटू लागले आहे. मात्र थंडीची लाट येणार असा अंदाज व्यक्त केला जात असून तसेच वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर
हवामान खात्याने थंडीची लाट येणार व थंड वारा सुटणार असा व्यक्त केला आहे. त्यानुसार थंड वारा सुटत असून थंडीचा जोर वाढला आहे. त्यानंतर आता पारा घसरल्याने बुलडाणा सर्वांत कमी ९.२ अंश सेल्सिअसवर आला व विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. तर गोंदिया जिल्हा १०.२ अंश सेल्सिअसने दुसऱ्या क्रमांकावर होता.