गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी दहा टन लिक्विड ऑक्सिजन गोंदिया जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे ऑक्सिजनच्या टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील कोरोनाच्या परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे पूर्ण लक्ष असून, ते दररोज दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल हे मागील दोन-तीन दिवसांपासून ऑक्सिजन व्यवस्थापन प्लांट आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आइनॉक्स समूहाचे प्रमुख सिद्धार्थ जैन यांच्या संपर्कात होते. त्यांच्याशी चर्चा करून दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यास सांगितले.
यानंतर कंपनीने त्वरित दहा टन लिक्विड ऑक्सिजन पुरवठा केला आहे. हे दहा टन लिक्विड ऑक्सिजन घेऊन टँकर (एमएच ४०, वाय ९४६०) गोंदिया येथे सोमवारी (दि. १९) रात्री दाखल झाले. तसेच ड्युरो सिलिंडर, लिक्विड ऑक्सिजनचा नियमित पुरवठा व्हावा यासाठीसुद्धा खा. पटेल प्रयत्नरत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशात जिल्हावासीयांनी धैर्याने या परिस्थितीला सामोरे जात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी कळविले आहे.