गोंदिया : जादूटोण्याचा संशय घेऊन इसमाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२९) हा निर्णय सुनावला आहे. लेखराम कोदू वंजारी (३२,रा. घाटबोरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.सविस्तर असे की, सडक/अर्जुनी तालुक्याच्या घाटबोरी येथील महादेव विठोबा वैद्य (६५) यांच्यावर जादूटोन्याच्या संशय घेऊन आरोपी लेखराम वंजारी याने २६ आॅगस्ट २००९ रोजी लोखंडी कात्याने प्राणघातक हल्ला केला होता. डुग्गीपार पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०७,४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश (प्रथम) एस.आर.त्रिवेदी यांनी सुनावनी करून आरोपी लेखराम वंजारी याला कलम ३०७ अंतर्गत १० वर्षांची शिक्षा, दोन हजार रुपये दंड तसेच कलम ४४८ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. कैलाश खंडेलवाल यांनी काम पाहिले असून १६ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार श्यामराव दानी, फुलसुंगे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास
By admin | Published: December 30, 2015 2:24 AM