एएमयू केले अनिवार्य : पाच हजार ४८५ बल्ब खरेदी प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एलईडी बल्व खरेदीच्या प्रक्रियेत लावण्यात आलेल्या अटीशर्ती कोणत्याही जीआरमध्ये देण्यात आलेल्या नाहीत. यानंतरही पाच हजार ४८५ एलईडी बल्ब खरेदीच्या निविदा प्रक्रियेत सदर अटी लावण्यात आल्याचे गोंदिया नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे अभियंता आर.पी. मारवाडे यांनी मानले. सदर खरेदी प्रक्रियेत आश्चर्यजनक अटी लावण्यात आल्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच वादात आली आहे. गोंदिया नगर परिषदेने पाच हजार ४८५ एलईडी बल्ब खरेदीच्या निविदा प्रक्रियेत एएमयू अनिवार्य केले आहे. एएमयू म्हणजे एक असे प्रमाणपत्र ज्यात जे खरेदी करण्यात येईल, तेच साहित्य लावण्यात येईल व याची तीन वर्षांची हमी राहील. मात्र हे अनिवार्य असू नये, असे २.९९ कोटी रूपयांच्या खर्चाने लागणारे एलईडी बल्ब खरेदीबाबत काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. भंडारा नगर परिषदेत एलईडी बल्ब खरेदीबाबत नागपूरच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की हे अनिवार्य नाही. परंतु आधी कंत्राटदाराला काम द्या व नंतर अटी पूर्ण करण्यात येतील, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. गोंदिया नगर परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निविदा उघडण्याची प्रक्रिया अनेकदा टाळण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया टाळण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे. यानंतरही कंत्राटदारांचे समाधान होत नसून ते नगर परिषदेच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्न उचलत आहेत. आठ कंत्राटदारांनी आपल्या निविदासुद्धा भरल्या आहेत. नगर परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे अधिकारी आर.पी. मारवाडे यांना सांगितले की चांगल्या कामावर अशाप्रकारचे आक्षेप येतात. नियमानुसार उत्तम दर्जाचे साहित्य खरेदी करण्यात यावे, असे ते म्हणाले.
एलईडी खरेदीची निविदा प्रक्रिया वादात
By admin | Published: June 01, 2017 1:00 AM