कोरोना विषाणूच्या महामारीत सुरू असलेल्या संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. परंतु नुकतीच तेंदुपत्ता तोडणीला कामाला सुरुवात झाल्यामुळे तेंदुपत्ता संकलनाच्या कामामधून अनेक गावांतील लोकांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊन काळात या परिसरातील नागरिकांच्या हाताला काम नव्हते. लहान-मोठ्या व्यावसायिकांवर लॉकडाऊनचा फार मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा? असा प्रश्न निर्माण झाला असतानाच केशोरी परिसरातील अनेक गावांमध्ये तेंदुपत्ता संकलनाची कामे नुकतीच सुरू झाल्यामुळे फार मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. सकाळपासून तेंदुपत्ता संकलन करून पुढा बांधून गावातील फळीवर पोहोचवून देण्याच्या कामात लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत घरचे सर्वच व्यक्ती गुंतलेली दिसून येत आहेत. हा परिसर मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे तेंदुपत्ता संकलनाचे काम प्रत्येक खेड्यामधून केले जाते. यामुळे बऱ्याच गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होत असते. लॉकडाऊनच्या काळात तेंदुपत्ता संकलनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाल्यामुळे या परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
केशोरी परिसरात तेंदुपत्ता तोंडणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:27 AM