गोंदिया : रेल्वेच्या गाड्या अगोदरच उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. त्यात आता प्रवाशांचे टेन्शन वाढविणारा आणखी एक निर्णय रेल्वेने घेतला आहे. तो म्हणजे, १३ ते १६ जुलै दरम्यान रेल्वेने १३ गाड्यांचे परिचालन रद्द केले आहे. नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा निर्णय घ्यावा लागला असून यामुळे प्रवाशांनी त्रासापासून वाचण्यासाठी प्रवासापूर्वी गाड्यांची स्थिती जाणूनच ठरविणे गरजेचे आहे.
रेल्वे विभागाकड़ून प्रवाशांच्या सुविधेसाठी नवनवे प्रयोग केले जात असून नवनव्या आरामदायी व तेवढ्याच फास्ट गाड्या सुरू केल्या जात आहेत. मात्र असे असतानाच मागील सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून गाड्या चांगल्याच उशिराने धावत आहेत. परिणामी गाड्यांच्या या लेटलतिफीमुळे प्रवासी चांगलेच संतापले आहेत. मात्र पर्याय नसल्यामुळे त्यांनाही मनमारून प्रवास करावाच लागत आहे. मात्र आजचा त्रास उद्यासाठी चांगले काही तरी नवे घेऊन येणार आहे यात शंका नाही. विशेष म्हणजे, तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम जोमात सुरू असून पुढे ही सुद्धा प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.
हीच तिसरी रेल्वे लाईन राजनांदगाव-कलमना रेल खंडाच्या मधात गुदमा रेल्वे स्थानकाला जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. नॉन इंटरलॉकिंगचे हे काम १३ ते १८ जुलैदरम्यान केले जाणार असून यासाठी रेल्वेने १३ गाड्यांचे परिचालन या कालावधीत रद्द केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे मात्र प्रवाशांची चांगलीच फसगत होणार यात शंका नाही. अशात प्रवाशांनी गाड्यांची स्थिती बघूनच प्रवास ठरविणे गरजेचे आहे.
या गाड्या केल्या आहेत रद्द
- रामटेक-इतवारी मेमू पॅसेंजर स्पेशल (०८७५५), इतवारी-रामटेक मेमू पॅसेंजर स्पेशल (०८७५६), कोरबा-इतवारी एक्स्प्रेस (१८२३९), इतवारी-कोरबा एक्स्प्रेस (१८२४०), बिलासपूर-इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस (१२८५५), इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस (१२८५६), टाटानगर-इतवारी एक्स्प्रेस (१८१०९), इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस (१८११०), गोंदिया-रायपूर मेमू पॅसेंजर स्पेशल (०८७२४), रायपूर-डोंगरगड मेमू स्पेशल (०८७२१), डोंगरगड-गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल (०८७२३), बालाघाट-इतवारी पॅसेंजर स्पेशल (०८७१५) व इतवारी-गोंदिया-बालाघाट पॅसेंजर स्पेशल (०८७१४) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.