जिल्हा सामान्य रूग्णालय : जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाची सांगतागोंदिया : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम ३ ते १० आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात आले. या कालावधीत केटीएस रूग्णालयात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती व रूग्णांना उपचार मिळण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालय तसेच काही निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनोविकृती तज्ज्ञ यांच्या समवेश एक चमू जावून मानसिक आजाराने ग्रस्त रूग्णांची तपासणी करण्यात आली. रूग्णांना त्याच ठिकाणी औषध पुरवठासुद्धा करण्यात आला. त्यांचे समुपदेशन व पुरर्वसन याबाबत कार्य केले गेले. त्यामुळे रूग्णांना उपचाराशी निगडीत सर्व सेवा त्यांच्या गावस्तरावर व तालुका स्तरावर उपलब्ध होतील.जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी मानसिक रूग्णांची तपासणी करण्यात आली. महिलांसाठी ताणतणाव मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. स्वीकार मतिमंद शाळा येथे मतिमंद रूग्णांच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्याच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.या ताणतणावमुक्त मानसिक आरोग्य शिबिरात एकूण १७७ रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत औषध पुरवठा करण्यात आला. यात स्वीकार मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांची बुद्ध्यांक तपासणी करण्यात आली. मानसिक आजारग्रस्त रूग्णांचे व त्यांच्या नातलगांचे समुपदेशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर होते. अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, नायब तहसीलदार विजय पवार उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र चौबे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिबू आचार्य, डॉ. आनंद लाडे, डॉ. यामिनी येळणे, डॉ. दीपक अवचट उपस्थित होते. शिबिरात नर्सिंग कॉलेज, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय येथील विद्यार्थिनींनी मानसिक आजार या विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी राहत व बचाव कार्य याबाबत प्रात्यक्षिके सादर केली. प्रास्ताविक डॉ. आनंद लाडे यांनी मांडले. संचालन सामाजिक कार्यकर्ता दीपक थाटे यांनी केले. आभार डॉ. यामिनी येळणे यांनी मानले. मान्यवरांनी केटीएस रूग्णालयात जनतेने मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शिबिरासाठी अमित वागदे, दीपक थाटे, मीना रेवतकर, वैशाली थूल, दीपक आगुलवार, मयूर कांबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
शिबिरातून तणावमुक्तीचा संदेश
By admin | Published: October 14, 2016 2:17 AM