शिक्षक सज्ज : एकूण १९०८ विद्यार्थी देणार परीक्षासालेकसा : मंगळवार १ मार्चपासून सुरू होत असलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत सालेकसा तालुक्यात एकूण १९०८ विद्यार्थी बसणार आहेत. यासाठी तालुक्यातील एकूण आठ परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रावर वेळेवर प्रश्न पत्रिका पोहोचविणे व उत्तरपत्रिका संकलन करण्यासाठी पुरेशी तयारी आणि व्यवस्था करण्यात आली असून यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कस्टडी केंद्र स्थापित करण्यात आले आहे. दरवर्षी तालुक्यात एकूण सात परीक्षा केंद्र राहत होते. यंदा दरेकसा येथे नवीन परीक्षा केंद्र आले असून आता परीक्षा केंद्राची संख्या आठ झालेली आहे. तालुक्यातील एकूण वीस शाळेतील १९०८ विद्यार्थी आठ केंद्रावर परीक्षा देणार आहेत. त्यापैकी केंद्र क्रमांक २१३० जि.प. हायस्कुल साकरीटोला येथे साखरीटोलासह विद्या गर्ल्स हायस्कुल सातगाव मिळून २५४ विद्यार्थी परीक्षा देतील. केंद्र क्रमांक २१७६ सालेकसा हायस्कुल येथे जानकीबाई विद्यालय सालेकसा येथील ही विद्यार्थी सहभागी होणार असून दोन्ही शाळेतील ३४२ विद्यार्थी सहभागी होतील. यात सालेकसा हायस्कुलच्या हिंदी आणि मराठी दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी राहतील. केंद्र क्रमांक २१७७ जि.प.हायस्कुल कावराबांध येथे कावराबांधसह गवराबाई हायस्कुल झालीया आणि शहीद अवंती विद्यालय कोटजमुरा येथील विद्यार्थी मिळून एकूण ३३० मुले- मुली परीक्षेत बसत आहेत. केंद्र क्रमांक २१७८ ग्राम विकास विद्यालय तिरखेडी येथील परीक्षा केंद्रावर तिरखेडी आणि नारायण बहेकार हायस्कुल लोहारा, तसेच लोकमान्य टिळक विद्यालय दरबडा असे एकूण तिन्ही शाळेचे २३९ विद्यार्थी परीक्षेत बसतील. केंद्र क्रमांक २१७९ पंचशील हायस्कुल मक्काटोला येथील परीक्षा केंद्रावर मक्काटोलासह उज्जवला आदिवासी विद्यालय बिजेपार आणि शासकीय आश्रम शाळा बिजेपार या तिन्ही शाळेचे एकूण २०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्र क्रमांक २१८० स्वामी विवेकानंद हायस्कुल सोनपुरी येथे विरांगणा राणी अवंतीबाई हायस्कुल नाका निंबा या शाळेचे विद्यार्थी सहभागी होणार असून दोन्ही शाळेतील २१० विद्यार्थी परीक्षा देतील. केंद्र क्रमांक २१८१ पिपरीया हायस्कुल पिपरीया येथे पिपरीयासह कचारगड आदिवासी आश्रमशाळा पिपरीया या दोन शाळेचे १७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्र क्रमांक २१९१ गुरुदेव हायस्कुल दरेकसा येथे नवीन परीक्षा केंद्र बोर्डाने दिलेला असून दूरस्थ आदिवासी क्ष्यत्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या परिसरातील विद्यार्थी परीक्षा काळात १४, १५ कि.मी. लांब प्रवास करून सालेकसा आकणि पिपरीया येथे परीक्षा देण्यासाठी जात होते. या नवीन केंद्रावर दरेकसासह ज्ञानदीप विद्यालय विचारपूर आणि शासकीय आश्रम शाळा जमाकुडो या तिन्ही शाळेचे एकूण १५८ विद्यार्थी परीक्षेत बसतील. या परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा ठेवण्यासाठी पोलीस शिपाही आणि गृह रक्षक दलाचे सिपाही बंदोबस्तासाठी लावण्यात येतील.पूर्ती पब्लिक शाळेचे विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचे असल्याने येथील एकूण आठ विद्यार्थी देवरी येथील परीक्षा केंद्रावर जातील. या शाळेतून प्रथम १० वीचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आठ केंद्रांवर आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा
By admin | Published: March 01, 2016 1:16 AM