गोंदिया : मागील दहा ते पंधरा दिवसांपासून लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने कोरोना टेस्टची संख्या वाढविली आहे. त्यामुळे रविवारपासून जिल्ह्यात कोराेनाबाधितांचा आलेख उंचावत असल्याचे चित्र आहे. रविवारी ४१ तर सोमवारी ४९ बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याने जिल्हावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सोमवारी ४९ बाधितांची नोंद झाली, तर १४ बाधितांनी कोरोनावर मात केली. सोमवारी आढळलेल्या ४९ बाधितांमध्ये सर्वाधिक २६ बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ३, गोरेगाव १, आमगाव ६, सालेकसा २, देवरी १ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात १० रुग्णांची नोंद झाली आहे. गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील तीन- चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गोंदियासह आता इतर तालुकेसुद्धा कोरोनाचे हॉट स्पाॅट होत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ८३८१५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७१७९२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत ७५९४२ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६९६५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४७५५ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४३२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत २४४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २८ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
......
गोंदिया तालुका होतोय कोरोनाचा हॉट स्पाॅट
जिल्ह्यात मागील आठ- दहा दिवसांपासून गोंदिया शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज २० ते २५ कोरोनाबाधितांची भर पडत आहे. त्यामुळेच या तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या ही गोंदिया तालुक्यात आहे. त्यामुळे हा तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे.
......
नागरिकांनो वेळीच व्हा सावध
जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सावध होत मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर आणि विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाने सुचविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे.
...........