गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचण्या करण्याचे प्रमाणसुद्धा बरेच कमी झाले आहे. जिल्ह्यात सध्या दररोज दीडशे ते दोनशे चाचण्या केल्या जात आहेत. त्यात बाधित रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.२०) १७४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे पॉझटिव्हिटी रेट शून्य होता. जिल्ह्यातील पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणून कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेले गोंदिया आणि तिरोडा हे दोन्ही तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात लसीकरणसुद्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४३२९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२४५६० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१८७३८ नागरिकांनी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा पॉझटिव्हिटी रेट ९९.२७ टक्के आहे.
..............