गोंदिया : स्पिरीटपासून बनावट देशी दारू तयार करुन विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने रंगेहात अटक केली. त्याच्याकडील बनावट दारूचा साठाही जप्त करण्यात आला. पांजरा (कामठाटोला) येथील बी.आर. दहीकर यांच्या देशी दारू दुकानातून नोकरनामाधारक रंजीत सुकलाल दहीकर (२३) रा.कामठा याला अटक झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक (गोंदिया ग्रामीण) बी.जी. भगत यांनी सदर आरोपीकडून बनावट देशी दारुच्च्या १८० मिली क्षमतेच्या १५५ बाटल्या, २० लिटर क्षमतेच्या प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे ९ लिटर स्पिरीट, दोन मोबाईल असा एकूण १४ हजार ६२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सरकारमान्य देशी दारु दुकानातून बनावट देशी दारु विक्री केल्यामुळे सदर दुकान सील करण्यात आले. आरोपीला महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (ए.बी.डी.ई.) ८१, ८३, १०५ व १०८ अन्वये अटक करण्यात आली असून सदर दुकानाविरुद्ध नियमभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासात आरोपी रंज़ीत सुकलाल दहीकर याने बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट रंजीत रामदास उके (३१) राहणार काटी ता. जि. गोंदिया यांचेकडून खरेदी केल्याचे कबूल केल्याने रंजीत उके याला अटक करण्यासाठी अधीक्षक एन.के. धार्मिक, बी.जी. भगत, दुय्यम निरीक्षक, गोंदिया ग्रामीण, सहायक दुय्यम निरीक्षक हुमे, जवान पागोटे, मुनेश्वर व वाहन चालक मडावी व वाहनचालक मिर्झा त्यांच्या काटी येथील घरी गेले असता आरोपी रंज़ीत उके तेथून फरार झाला. त्याचा शोध सुरू असून बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरीट व बॉटलिंगसाठी साहित्य, बुचे कुठून आणली जातात याचा सखोल तपास सुरु आह े. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर आळा बसण्याकरिता सायंकाळच्या व रात्रीच्या वेळेस रस्त्यालगत असलेल्या धाब्यावरुन अवैध दारू विक्री होऊ नये याकरिता सर्व धाब्यांची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे. अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे देशी, विदेशी दारुची विक्री िहोत असल्याचे आढळून आल्यास संबंधित धाबा चालक, मालक व त्या ठिकाणी बसून मद्य पिणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले. या व्यतिरिक्त ड्राय-डेच्या दिवशी छुप्या मार्गाने दुकानातून ग्राहकांना बेकायदेशीररित्या मद्याची विक्री करणाऱ्या संशयीत अनुज्ञप्तीधारकांवरही विभाग करडी नजर ठेवून आहे. ड्राय-डेच्या दिवशी दारूची दुकान उघड्ल्याचे आढळून आल्यास दुकान कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला बनावट मद्यसाठा
By admin | Published: January 28, 2017 12:32 AM