गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या हवालदाराला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणेदारालाही अटक केली आहे. या प्रकरणातील पहिला आरोपी हवालदार रामसिंह सूरजनाथसिंह बैस (४८) असून आता पोलीस निरीक्षक व ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार रंगनाथ त्र्यंबक धारबळे (४०, रा. टी. बी. टोली, गोंदिया) यांना सोमवारी (दि.१५) अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हवालदार रामसिंह बैस याने तक्रारदार उत्तमचंद मोहन खांडेकर (५०, रा. तांडा) यांना त्यांच्याविरुद्ध पारीत झालेल्या हद्दीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून त्यात मदत करण्यासाठी स्वत:साठी पाच हजार रुपये तर ठाणेदारांसाठी १० हजार रुपये अशा एकूण १५ हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली होती. १७ जानेवारी रोजी घडलेल्या या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदार बैस याला रंगेहाथ पकडून कारवाई केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ठाणेदार धारबळे यांनी आरोपी हवालदार बैस याला प्रोत्साहन देऊन मदत केल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.१५) कारवाई करीत लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम १२ अंतर्गत वाढ करून ठाणेदार धारबळे यांना अटक केली आहे.