गोंदिया : उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी न घेता वाहनाचे मूळ रूप पालटून टाकणाऱ्या वाहनमालकाला पोलिसांनी दणका दिला. डुग्गीपार पोलिसांनी नवेगावबांध टी पाॅइंट कोहमारा येथे २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजतादरम्यान ही कारवाई केली. या वाहनावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने १७,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आजघडीला कोणताही कार्यक्रम असो त्यात डीजेलाच सर्वाधिक मागणी असते. यामुळेच जिल्ह्यात डीजेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात आपला डीजे सर्वांहून वेगळा दिसला पाहिजे यासाठी डीजे मालक डीजेसाठी वाहन घेत असून वाहनाचे मूळ रूप पालटून आपल्या सोयीनुसार त्यात नवनवे प्रयोग करीत आहेत. कोणत्याही वाहनाच्या मूळ रूपात कसाही बदल करावयाचा असल्यास त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी काही शुल्क आकारले जात असून ते भरावा लागते. मात्र यासाठी आपल्या खिशावर भार कशाला म्हणून कुणीही परवानगी न घेताच वाहनांत डीजेच्या सोयीनुसार बदल करून घेत आहेत. हे लक्षात घेत डुग्गीपार पोलिसांनी २० डिसेंबर २०२३ रोजी अर्जुनी-मोरगावमार्गे कोहमाराकडे येणाऱ्या डीजे वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १०३४ ला नवेगावबांध टी पॉईंट कोहमारा येथे सकाळी ८:३० वाजतादरम्यान थांबविले. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता वाहनमालकाने वाहनाचे मूळ स्वरूप बदलून त्यावर डीजेचे साहित्य लावल्याचे दिसून आले.
पोलिसांनी कारवाईबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनावर दंडात्मक योग्य कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला. पोलिस कारवाईची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहन क्रमांक एमएच ३५- एजे १०३४ वर कारवाई करुन १७, ५०० रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, हवालदार दीपक खोटेले, पोलिस नायक महेंद्र चौधरी, शिपाई सुनील डहाके यांनी केली आहे.