लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक तीन दिवसांवर आली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा आत्मविश्वास आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांनीसुद्धा एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीला घेऊन दोन दिवसात पुन्हा नवीन व्टिस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेत नवीन समीकरणाचे संकेत दिले जात आहेत. जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यात आठपैकी पाच पंचायत समितींवर भाजपने वर्चस्व मिळवले. तर काँग्रेस एक, वंचित एक आणि गोंदिया पंचायतीवर चाबीने सत्ता स्थापन केली. या निवडणुकीने जिल्हा परिषद निवडणुकीचे बरेचसे चित्र स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी १० मे रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता सर्वाधिक २६ सदस्य भाजपचे असल्याने त्यांना सत्तेचे प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, त्यांचे समीकरण अपक्षांवर अवलंबून आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष हे एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण जुळून येऊ शकते. सध्या त्यादृष्टीने हालचालीसुद्धा जोरात सुरू आहेत. या निवडणुकीत काहीही होण्याची शक्यता आहे. तर भाजपमधील एक आठ सदस्यांचा गट निवडणुकीदरम्यान बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये, अशी शक्यतासुद्धा आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सदस्यांमध्ये फूट पडू नये, याची काळजी घेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांचे ओठात एक अन् पोटात एक असे धोरण असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत बरेच वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजप सदस्यांचा तीन दिवसांपासून हैद्राबाद येथे मुक्काम - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान आपल्याच पक्षातील सदस्य फुटू नये, यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जाते. यासाठी तीन दिवसांपूर्वीच भाजपच्या सर्व सदस्यांना हैद्राबाद येथे पर्यटनासाठी नेण्यात आले आहे. हे सर्व सदस्य ९ मे रोजी गोंदियात दाखल होणार आहे. या सदस्यांसोबत दोन अपक्ष सदस्यदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोंदियातील निवडणुकीचे भंडाऱ्यात उमटणार पडसाद - गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक एकाच दिवशी होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या समीकरणावर भंडारा जिल्हा परिषदेचे बरेचसे समीकरण अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील पक्षाचे प्रमुख नेते या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी एकमेकांचे विरोधक असलेले वेळ पडल्यास सत्तेसाठी एकत्र येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
सत्तेसाठी नेत्याच्या पुत्राची धडपड - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी व अध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा, यासाठी एका नेत्याच्या पुत्राने सर्व सूत्रं आपल्या हाती घेतल्याची चर्चा आहे. अध्यक्ष आमचा बाकी सर्व पदे तुम्हाला, पण सत्तेसाठी आमच्यासोबत या, अशी ऑफरसुद्धा या नेत्याच्या पुत्राने एका पक्षाच्या नेत्याला दिल्याची माहिती आहे. मात्र, जुना हिशोब चुकता करण्याची ही नामी संधी त्या नेत्याकडे चालून आल्याने त्यांनीसुद्धा ही ऑफर फेटाळल्याची माहिती आहे.