सालेकसा : दिगंबर जैन मुनी राष्ट्रसंत विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी डोंगरगड येथे जात असलेल्या जैन भाविकांची कार आमगाव-सालेकसा महामार्गावरील पानगावजवळ रविवारी (दि.१८) दुपारी १ वाजता दरम्यान कालव्यात पडली. त्यात कारमध्ये बसलेल्या तिघा जैन भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर समोर बसलेल्या तिघे काच फोडून बाहेर निघून आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. विमलकुमार जैन (५२), प्रशांत नरेंद्रकुमार जैन (४४) आणि आशिष अशोककुमार जैन (४२, तिघे रा. जि. सतना, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
राष्ट्रसंत दिगंबर जैन मुनी विद्यासागर महाराज यांनी छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे देहत्याग केला असून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर सतत चालत असल्याने बातम्या पाहताच रविवारी सकाळपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यांतून भाविक जात आहेत. त्यामध्ये सतना येथील त्यांचे जैन अनुयायी आचार्य विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी निघाले असता बालाघाटवरून आमगाव-सालेकसा मार्गाने आर्टिका कार क्रमांक एमपी १९-सीबी ६५३२ डोंगरगडकडे जात होते. या मार्गावर अनेक जीवघेणे खड्डे असून हे खड्डे चुकविताना चालक अंशुल जैन याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने पानगावजवळ वळणावर वाहत्या कालव्यात भरधाव वेगाने जात असलेली त्यांची कार पडली.
या कारमध्ये विमलकुमार जैन (५२), प्रशांत नरेंद्रकुमार जैन (४४), आशिष अशोककुमार जैन (४२), वर्धमान सिद्धार्थ जैन (४४) अंशुल संतोषकुमार जैन (४५) आणि प्रशांत प्रसन्न जैन (४२, सर्व रा. सतना, मध्यप्रदेश) होते. कारचे दरवाजे लाॅक असल्याने मध्ये बसलेले विमल जैन, प्रशांत जैन आणि आशिष जैन हे तिघे कारसह पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर समोर बसलेल्या वर्धमान जैन, अंशुल जैन आणि प्रशांत जैन हे समोरची काच फोडून बाहेर निघाले. तिघांचे मृतदेह सालेकसा पोलिसांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेले तर बाहेर पडलेल्या तिघांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयातच उपचार दिला जात आहे. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करत आहेत.