नरेश रहिले, गोंदिया: गोरेगाव तालुक्याच्या चिरामनटोला येथील एका २९ वर्षाच्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय-४ ने न्यायाधीश वाय. जे. तांबोळी यांनी ही शिक्षा २० डिसेंबर रोजी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी जितेंद्र ताराचंद बोपचे (३७) रा. चिरामनटोला ता. गोरेगाव असे आरोपीचे नाव आहे.
त्याने ६ ऑक्टोबर २०२२ रोजी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिला ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात तिने गोरेगाव पोलिसात तक्रार केली होती. गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने तीन साक्षदार तपासले. आरोपीचे वकील व फिर्यादीचे वकील यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला कलम ३५४ अंतर्गत तीन वर्षाचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. कलम ५०६ अंतर्गत २ वर्षाचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील मुकेश बोरीकर यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस कर्मचारी टेकाम यांनी सहकार्य केले.