लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात येतात. गुन्ह्याच्या तपासाअंती न्यायप्रक्रियेकरिता प्रकरण न्यायालयात सादर करण्यात येतात. न्यायालयाने प्रकरणांच्या सुनावणीकरिता गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार, आरोपींना न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स, वॉरंट बजावल्यास तत्काळ न्यायालयात हजर व्हा, अन्यथा समन्स व वॉरंटद्वारे साक्षीदार किंवा आरोपी हजर न झाल्यास आपल्याला पकडण्याचे वॉरंट निघेल अन् आपल्याला पोलिस पकडतील.
न्यायालयातील प्रकरणांची निर्गती करण्याकरिता न्यायालयाद्वारे काढण्यात येणारे समन्स, वॉरंटवरसुद्धा काही साक्षीदार, आरोपी दिलेल्या तारखेवर हजर राहत नाही. परिणामी न्यायालयात प्रकरणांच्या सुनावणीकरिता विलंब होतो. परिणामी गुन्हेगार सुटण्याचे प्रमाण वाढते. याला पायबंद व्हावा, तसेच दाखल गुन्ह्यातील साक्षीदार, आरोपींनी न्यायालयात दिलेली तारीख, वेळेवर हजर राहावे, अन्यथा आपल्याला न्यायालय दंडीत करू शकते.
जिल्हा पोलिसांकडून न्यायालयाद्वारे काढण्यात येणाऱ्या समन्स, वॉरंट बजावणीचे काम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे. यापुढे आता न्यायालयाचे समन्स, वॉरंट टाळणे महागात पडणार आहे.
न्यायालयाने बोलाविल्यास तत्काळ जावे कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार, आरोपींना न्यायालयात हजर राह- ण्याबाबत समन्स, वॉरंट बजावल्यास तत्काळ न्यायालयात हजर होणे अपेक्षित आहे. समस, वॉरंट बजावूनही साक्षीदार किंवा आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे समजून त्यांना पोलिस पकडून तुरुंगात टाकतील.
दुर्लक्ष करू नका "जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी, साक्षीदारांना न्यायालयाने समन्स, वॉरंटद्वारे न्यायालयात हजर राहण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाच्या दिवशी हजर राहणे अनिवार्य आहे. यात टाळाटाळ करू नये अन्यथा आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे नोंदविले जाऊ शकतात. न्यायप्रणालीस व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे." - गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया