गोंदिया : जगातील अर्थव्यवस्थेत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर पुढील दोन तीन वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून जर्मनी आणि जपानच्या सुध्दा पुढे गेलेला असेल. भारताचा झपाट्याने विकास होत असून भारत देश एक महासत्ता म्हणून जगात पुढे येत आहे. मिशन २०४७ विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दृष्टीने महामॅरेथॉनला सुरुवात झाली असून विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण होवून नवा भारत निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यांचे शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. ११) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, डॉ. सुदीप धनखड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय व उच्च तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा. प्रफुल्ल पटेल, खा. श्रीकांत शिंदे, खा. एम.रमेश, खा. राहूल कासलीवाल, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल उपस्थित होते. मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मार्ल्यापण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, मागील दहा वर्षांत देशाने झपाट्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे भारत देश एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात असून यातून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल होत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाला तर खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो. त्याच दृष्टीने आपल्या देशाची वाटचाल सुरु आहे. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे स्वत:चा उदरनिर्वाह कसा होईल असा विचार करणार व्यक्ती आता इतरांना रोजगार देत असल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सर्वसामान्यांची वास्तविकता जाणून त्या दृष्टीने काम करणारे असल्याने २०४७ मध्ये विकसीत आणि नव भारताचे स्वप्न नकीच होईल यात कुठलेही दुमत नसल्याचे ते म्हणाले....................................
धानाचे मुल्यवर्धन होणे गरजेचेशिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांचे शिक्षण क्षेत्रासह कृषी आणि सिंचन क्षेत्रात सुध्दा व्यापक योगदान आहे. गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून येथे दर्जेदार प्रतिचा तांदूळ होतो. त्याच्या विविध प्रजातींची माहिती सुध्दा मला येथील कृषी प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर मिळाली. धानावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची स्थापना करुन धानाचे मुल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचा आर्थिकस्तर सुधारण्यास निश्चित मदत होईल म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले.
.............................मनोहरभाई पटेल भवनसाठी ३० कोटींची घोषणा
गोंदिया येथील नगर परिषदेच्या परिसरात मनोहरभाई पटेल भवन उभारण्यासाठी ३० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विकासात्मक कामासाठी निधीची कमी पडू देणार नसून विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली..................................
महायुतीत जाण्याचे संकेत मागच्यावर्षीच दिले होतेमागील वर्षी ९ फेब्रुवारी मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हाच आम्ही अप्रत्यक्षपणे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले होते. पण ते अनेकांना ते कळले नाही. महायुतीच्या माध्यमातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे भविष्यातही सुरुच राहतील असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.