अंकुश गुंडावार
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शनिवारी (दि.६) सकाळी या धरणाचे ४ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. यातून ८६.५० क्यमुेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे शनिवारी सकाळी ११ उघडण्यात आले. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी काठालगतच्या ३५ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोडलेला ३०५४ क्यूसेक्स विसर्ग सामान्य आहे तरी नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये.
शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयात येणारा पाण्याचा येवा पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.