नरेश रहिलेगोंदिया : मुंबई पोलिसात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन तरुणीने एक, दोन नव्हे तर चक्क पाच जणांची तब्बल ४७ लाख रुपयांनी फसवणूक केली. एवढेच नव्हे तर त्यांना मुंबई पोलिसचे खोटे नियुक्तीपत्र दिले. डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यानचे हे प्रकरण असून, सालेकसा पोलिसांनी याप्रकरणी तरुणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आमगाव तालुक्यातील ग्राम जवरी येथील अंजली वासुदेव हत्तीमारे (२७) हिचे भोसा (कालीमाटी) येथील यशवंत ब्राह्मणकर सोबत लग्न झाले. यानंतर अंजली यशवंत ब्राम्हणकर (नवऱ्याकडील नाव) हिने मुंबई पोलिसात नोकरी लावून देण्याच्या नावावर बद्रीप्रसाद परशुराम दशरीया (४३), जागेश्वर खेदलाल दसरीया (४७ दोन्ही रा. ब्राम्हणटोला), चैनसिंग डोमनसिंग मच्छिरके (५०, रा. कावराबांध), भाऊलाल श्रावण शिवणकर व चंद्रशेखर प्रदीप फुंडे दोन्ही (रा. सालेकसा) यांच्याकडून डिसेंबर २०२१ मध्ये ४७ लाख ३० हजार रुपये ग्राम आमगाव खुर्द येथील भाऊलाल शिवणकर यांच्या घरी घेतले.पैसे दिल्यानंतरही नोकरीचा काहीच पत्ता लागत नसल्याने अखेर त्या पाच जणांनी अंजलीला वारंवार विचारणा केली असता तिने बोगस नियुक्तीपत्र तयार करून त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठविले. डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात हे सर्व प्रकरण घडले असून, यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्या पाच जणांनी पोलिसांत धाव घेतली. यावर अंजली ब्राह्मणकरवर सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४१७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.पैसे देणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी- नोकरीच्या नावावर पैसे दिले; परंतु नोकरी न दिल्याने पैसे देणाऱ्यांनी आपले पैसे परत मागितले. परंतु पैसे परत न देता पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी अंजली ब्राम्हणकर हिने त्यांना दिली. त्या धमकीला बघून पैसे देणाऱ्यांनी आधीच पोलिसांत तक्रार केली.१० लाख ४० हजार रुपये केले परत- नोकरीसाठी ४७ लाख ३० हजार रुपये देऊनही नोकरी न मिळाल्याने पैसे देणारे वारंवार अंजलीला तगादा लावत होते. यावर तीने बद्रीप्रसाद परशुराम दशरीया (४३), जागेश्वर खेदलाल दसरीया (४७) या दोन्ही भावंडांचे ८ लाख ५० हजार रुपये तर चंद्रशेखर फुंडे यांचे १ लाख ९० हजार रुपये असे एकूण १० लाख ४० हजार रुपये परत केले.