अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वच जिल्ह्यात तापमान वाढत आहे. विदर्भात तर अधिकच तापमान वाढत असल्याने धावत्या वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहन चालविताना चालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविण्यापूर्वी टायरची तपासणी करून खात्री करून घ्यावी. वाढत्या तापमानामुळे डांबरी तथा सिमेंटचे रस्ते अधिक प्रमाणात तापतात. उन्हात वाहन एकसारखे चालवीत असल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणाने टायर फुटण्याची शक्यता असते. महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे वाहने चालविताना टायर बरोबर आहे काय, हे तपासण्याची गरज आहे.
तापमान ४१ अंशांवर
यावर्षी मे महिन्याच्या उष्णतामानाचे चटके मार्चच्या मध्यापासूनच सहन करावे लागत आहेत. हल्ली तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत उष्णतामान चांगलेच वाढले आहे.
टायर फुटून अपघात वाढले
- दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत आहे. यामुळे सिमेंट रस्ते अधिक तापतात. रस्ता आणि टायरच्या घर्षणामुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.- नुकताच आठवड्यापूर्वी देवरी तालुक्यातील वडेगावजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यातील दोनजण बचावले
उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल?
- उन्हाळ्यात वाहन चालविण्यापूर्वी टायरची हवा तपासून घेतली पाहिजे.- उन्हात गाडी चालविताना एकसारखी न चालविता काही अंतरावर विश्रांती द्यावी. वाहन दुपारी सावलीच्या ठिकाणी पार्क करावे. टायर जास्त गरम झाल्यास त्यावर पाणी टाकून थंड केले पाहिजे, टायर उच्च प्रतीचे असणे गरजेचे आहे.
दुपारी वाहन न चालविलेलेच बरे- शक्यतोवर वाहनाचा प्रवास सकाळी व सायंकाळीच करावा. दुपारी बारा ते चार वाहन चालविणे टाळलेलेच बरे, सकाळ, सायंकाळच्या तुलनेत दुपारचे तापमान अधिक उष्ण असल्याने टायर फुटण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात वाहनांची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वाहन सर्व्हिसिंग करून घेतले पाहिजे, उच्च प्रतीच्या टायरचा वापर केल्यास फारच उत्तम, दुपारच्या उन्हात वाहन चालविणे टाळलेलेच बरे. हवा आवश्यकतेनुसार भरावी. -दिनेश जाजू, गॅरेज चालक,