लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पावसाळा संपला असून, मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरीही लावलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा उन्ह तापू लागले आहे. ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढता राहणार असे महिन्याच्या पहिल्याच दिवशी जाणवले. मध्यंतरी २८ अंशांवर गेलेले तापमान मंगळवारी (दि.२) थेट ३४.५ अंशांवर पोहोचले. यामुळे मात्र नागरिकांचा जीव कासाविस झाला असून, अंगावर घामाच्या धारा वाहताना दिसत आहे.
यंदा वरुणराजा जिल्ह्यावर चांगलेच मेहरबान दिसून आले व यामुळेच जिल्ह्यात तब्बल १११ टक्के पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जून महिन्यात डोळे दाखविल्यानंतर जुलै महिन्यापासून पावसाने चांगलीच साथ दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ९ व १० तारखेलाही पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. दुसऱ्यांचा पूरस्थिती निर्माण केली होती. पावसाच्या हजेरीमुळे नदी-नाले व तलाव तुडुंब झाले असून, पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे.
असे असताना हवामानातील उकाडा काही केल्या कमी झालेला नाही. पाऊस बरसत होता तोपर्यंत हवामानात गारवा निर्माण होऊन दिलासा मिळत होता. मात्र, पाऊस थांबताच उकाडा वाढून अंगाची लाहीलाही होऊ लागली होती. एवढा पाऊस बरसल्यानंतरही हवामानात गारवा निर्माण होत नसल्याने निसर्गाचे चक्र समजण्यापलीकडे झाले आहे. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपला असून, मागील काही दिवसांपासून पावसानेही हजेरी लावलेली नाही. मंगळवारी (दि.१) जिल्ह्याचे तापमान ३४.५ अंशांवर पोहोचले होते. यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे.
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम सततच्या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. उन्हाची तीव्रता एवढी वाढली आहे की, मार्च-एप्रिल महिन्याची अनुभूती येत आहेत. घराबाहेर पडतानाही विचार करावा लागत आहे.
परत दिला यलो अलर्ट पावसाळा आता संपला असून पावसाने काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. अशातच हवामान खात्याने ५ व ६ तारखेला यलो अलर्ट दिला आहे.