गोंदिया : जिल्हा निवडणूक विभागाने पंचायत समिती सभापती निवडणूक ६ मे तर जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक १० मे रोजी जाहीर केली आहे. पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक आधी होत असल्याने या निवडणुकीत युती व महाविकास आघाडीच्या नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा ६ मे कडे लागल्या आहेत.
मागील तीन महिन्यापासून लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उच्च न्यायालयाच्या मौखीक निर्देशानंतर जाहीर करण्यात आल्या. जिल्हाधिकारी यांनी २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर केली. अधिसूचना जाहीर होताच राजकीय घडामोडींना गती आली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. तर भाजपचे २६ सदस्य असून अपक्ष सदस्यांच्या मदतीने जि.प.मध्ये सत्ता स्थापन करणे भाजपला सहज शक्य आहे. तर चार जागा जिंकलेल्या चाबी संघटनेचे समर्थन भाजपला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपच सत्तेचा प्रबळ दावेदार असल्याचे चित्र आहे.
अध्यक्षपदी कुणाची वर्णी लावायची यासाठी मागील आठवडाभरापासून भाजप नेत्यांचे मंथन सुरु आहे. याच विषयाला घेऊन आतापर्यंत दोन बैठका सुध्दा पार पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने तीन नावावर चर्चा झाली आहे. पण अंतिम निर्णय हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंतरच होणार असल्याने हे दोघेही कुणाच्या नावाला सहमती दर्शवितात. याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
अध्यक्षाच्या नावाला घेऊन चत्मकाराची शक्यता
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संजय टेंभरे, लक्ष्मण भगत, लायकराम भेंडारकर या तीन नावांची चर्चा होती. पण मागील तीन चार दिवसांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका नवीनच सदस्याच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर एका नावावर जिल्ह्यातील भाजप नेत्यांचे अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे भाजपकडून अध्यक्षपदासाठी वेळेवर नवीन नाव जाहीर करून चत्मकार घडविण्याची शक्यता आहे.
मर्जीतील अध्यक्षासाठी चाचपणी
जिल्हा परिषद अध्यक्षपदी सदस्याची वर्णी लावताना तो आपल्या मर्जीतील असावा अशी भावना भाजप नेत्यांची आहे. त्यामुळेच अजूनही कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अध्यक्ष आपल्या मर्जीतील असल्यास बरीच कामे तडीस लावण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मर्जीतील अध्यक्षाच्या नावाची सध्या चाचणी सुरु आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीत अद्यापही चर्चा नाही
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीला घेऊन सभागृहात नेमकी काय भूमिका घ्यायची यावर अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची बैठक पार पडली नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंद आहे. तर सभागृहात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु असताना या दोन पैकी एका पक्षाचे सदस्य सभागृहाबाहेर राहिल्यास नवलसुद्धा वाटणार नाही.
पं.स.सभापतिपद सर्वसाधारण इच्छुकांची गर्दी
जिल्ह्यातील आठपैकी चार पंचायत समितीच्या सभापतिपदी महिला विराजमान होणार असल्याचे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले आहे. तर चार पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण असल्याने यासाठी इच्छुकांची संख्यासुद्धा अधिक आहे. त्यामुळे नेमकी कुणाची वर्णी लावायची याला घेऊन नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.