गोंदिया : बुधवार ते शुक्रवारपर्यंत संततधार बरसलेल्या पावसामुळे यंदाची तूट भरून निघत होती. मात्र, शुक्रवारनंतर परत पावसाचा लहरीपणा सुरू झाला व पाऊस थांबताच हा फरक वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. ४) तुटीचा फरक ७७.९ मिमी होता. मात्र, आता त्यात वाढ झाली असून, सोमवारी (दि. ७) हाच फरक वाढून १०९ मिमीवर गेल्याचे दिसले.
यंदा सर्वच ऋतू लहरीपणा करताना दिसत आहेत. उन्हाळ्याने जून महिन्याच्या शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही. त्यानंतर कोठे जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला. जुलै महिन्यात पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम घेता येणार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, सुरुवातीपासून पावसाने हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस तुटीचा ठरला. सुरुवातीपासून पडलेली ही तूट भरता भरत नव्हती. मात्र, बुधवारपासून (दि. २) पावसाने संततधार सुरू केली व थेट शुक्रवारपर्यंत (दि. ४) झड लागली होती.
या संततधार पावसामुळे शुक्रवारी हा फरक सरासरी ७७.९ मिमीवर आला होता. यानंतर आता ही तूट भरून निघणार असे वाटत होते. मात्र, शुक्रवारनंतर पावसाने उघाड दिली व मधामधात हजेरी लावणे सुरू केले. यामुळे हा फरक परत एकदा वाढला असून, सोमवारी (दि. ७) सरासरी १०९ मिमी एवढा हा फरक दिसून आला.
आतापर्यंत सरासरी ६९३.१ मिमी. पावसाची नोंद
जिल्ह्यात सोमवारपर्यंत सरासरी ६९३ मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षी या दिवसापर्यंत म्हणजेच, ७ ऑगस्टपर्यंत सरासरी ८०२.६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी १०९ मिमी पाऊस कमी बरसला आहे. मागील वर्षी दमदार बरसलेल्या पावसामुळे यंदा पाणी टंचाई भासली नाही. शिवाय, शेतकऱ्यांना रब्बीचा हंगामही घेता आला. अशात यंदासुद्धा ही तूट भरून निघणे गरजेचे आहे.