गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभागाच्यावतीने कोरोनाकाळानंतर पहिल्यांदाच यावर्षी वन्यप्राणी गणनेसाठी पर्यटकांना संधी देण्यात आली होती. या गणनेदरम्यान एक मचाण तुटून खाली कोसळ्याने दोन पर्यटक जखमी झाले आहेत.
निर्धारित नियोजनानुसार पर्यटक हे वन्यजीव विभागाने सोबत दिलेल्या वनमजुरांसोबत रात्रीला मचाणीवर गेले. दरम्यान सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पिटेझरी गेटपासून काही अंतरावर असलेल्या चुनाभट्टी परिसरातील एका मचाणासमोरील पाणवठ्यावर बिबट आला असता त्या बिबट्याला बघतानाच २ पर्यटकांसह वनमजूर हे मचाण तुटल्याने खाली कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जखमींना रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यातील रायपूर निवासी सत्येंद्र शाहू यांचे दोन्ही पाय मोडल्याचे सांगितले जाते आहे तर हैद्राबाद येथील सचिन थंपी यांच्या गळ्याला बांबू लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रायपूर निवासी शाहू याना रात्रीला ३.३० वाजताच प्राथमिक उपचार करुन पाय तुटल्यामुळे रायपूरला रवाना करण्यात आले. शाहू हे छत्तीसगड सरकारमधील एका मंत्र्याचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे तर हैद्राबादचे सचिन थंपी हे व्यावसायिक आहेत. दोघेही अनेकदा याठिकाणी पर्यटनासाठी येत असल्याचे पिटेझरी येथील गाईडचे म्हणणे आहे.
ज्या मचाणीवर हे बसले होते, त्या मचाणींची बांधणीच व्यवस्थित झालेली नव्हती. त्या मचाणला जे सपोर्ट चांगले मिळायला पाहिजे होते ते बनविताना करण्यात न आल्याने ही घटना घडल्याचे पर्यटकांसह नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर वन्यजीव विभागात चांगलीच तारांबळ उडाली आहे तर पर्यटकांचे वजन अधिक असल्याने मचाण कोसळल्याचे कारण वनविभागाकडून पुढे केले जात आहे. रायपूर निवासी शाहू राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असून हे पर्यटनप्रेमी असल्याने गोंदियासह विविध ठिकाणी ते वन्यप्रेमी व विभागाच्या अनेक कार्यक्रमांत सातत्याने उपस्थित राहत असल्याचे काही गाईडने सांगितले. यासंदर्भात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलणे टाळले.