राजीव फुंडे
आमगाव (गोंदिया) : शाळेचे महत्त्वपूर्ण दस्तावेज, विद्यार्थ्यांचे टीसी, मार्कलिस्टसह दाखल्यांच्या नोंदी असलेला रेकाॅर्ड चक्क भंगार विक्रेत्याच्या दुकानात सापडल्याची घटना मंगळवारी (दि. १२) तालुक्यातील धामणगाव येथे उघडकीस आली. दरम्यान, या प्रकाराने शाळा व्यवस्थापनाचा गलथान कारभार पुढे आला असून गावकऱ्यांनी या प्रकाराला घेऊन संताप व्यक्त केला.
आमगाव पंचायत समिती अंतर्गत धामणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेचा रेकाॅर्ड मागील २० वर्षांपासून गहाळ झाला होता. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पाल्यांचे दाखले व शैक्षणिक कागदपत्रे मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागत होती. यात १९६० पासूनच्या शैक्षणिक रेकाॅर्डचा समावेश होता. मंगळवारी धामणगाव येथील भंगार विक्रेत्याकडे पाच पोत्यांमध्ये खरेदी केलेली रद्दी पडली होती. दरम्यान, या विक्रेत्याच्या दुकानात गावातील एक तरुण बसला होता. त्याने पोत्यातील रद्दी पाहिली असता त्यात शाळेचे दाखल खारीज रजिस्टर व इतर दस्तावेज आढळले. त्याने अजून काही कागदपत्रे पाहिली असता त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे दाखल खारीज प्रमाणपत्र आढळले.
दरम्यान, हे पाहून त्यालासुद्धा धक्का बसला. त्यांनी याची माहिती गावचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना दिली. त्यांनी भंगार विक्रेत्याच्या दुकानात पोहोचत पाच पोत्यांतील साहित्य तपासले असता त्यात धामणगाव शाळेचा २० वर्षांपूर्वी गहाळ झालेला शैक्षणिक रेकाॅर्ड सापडला. सरपंच व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी पंचनामा करून ही कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच या रेकाॅर्डची विक्री भंगार विक्रेत्याला कोणी केली याचा शोध घेतला जात आहे.
अनेकांना सहन करावा लागला होता मनस्ताप
धामणगाव शाळेचा शैक्षणिक रेकाॅर्ड गहाळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. तर काही उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागले होते.
शाळेच्या कर्मचाऱ्याने रद्दी विकल्याची चर्चा
भंगार विक्रेत्याला चार-पाच दिवसांपूर्वी शाळेच्या एका कर्मचाऱ्याने ही रद्दी विकल्याची चर्चा आहे. दरम्यान, रद्दी विकणारी ती व्यक्ती कोण याचा शोध घेतला जात आहे.
धामणगाव शाळेचा २० वर्षांपूर्वी गहाळ झालेला रेकाॅर्ड भंगार विक्रेत्याचा दुकानात आढळला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून हा रेकाॅर्ड शालेय व्यवस्थापन समितीच्या ताब्यात दिला आहे.
- रंजित शेंडे, सरपंच धामणगाव
मंगळवारी भंगार विक्रेत्याकडील रद्दीत आढळलेल्या पाच पोत्यांमधील शैक्षणिक रेकाॅर्ड हा पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. शाळेचे महत्त्वपूर्ण दस्तावेज रद्दीत कोणी विकले याचा शोध घेऊन त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.
- ओमप्रकाश सोनवाने, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, धामणगाव