नवेगावबांध (गोंदिया) : शेतकऱ्याच्या शेतात सौर पंप फिटिंगचे काम करून कारने आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांची कार झाडाला धडकली, त्यानंतर ती उलटली. या भीषण अपघातात चार तरुण ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी खोबा जंगल परिसरात झाला.
या अपघातात रामकृष्ण योगराज बिसेन (२४), सचिन गोरेलाल कटरे (२३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संदीप जागेश्वर सोनवाने (१८, रा. नवेगाव, ता. आमगाव) व चालक वरुण नीलेश तुरकर (२७, रा. भजेपार, तालुका आमगाव) यांचा उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे मृत्यू झाला. तर मधुसूदन नंदलाल बिसेन (२३) व प्रदीप कमलेश्वर बिसेन (२४, रा. नवेगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
हे सहाही तरुण आमगाव तालुक्यातील भजेपार व नवेगाव येथील रहिवासी असून, ते सौर पंप फिटिंगचे काम करतात. बुधवारी ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सौर पंप फिटिंग करण्याचे काम करण्यासाठी गेले होते. सौर पंप फिटिंगचे काम झाल्यानंतर ते रात्री टाटा नेक्सान क्रमांक एमएच-३५/एजी-८७७१ या कारने आमगावकडे परत येत होते. दरम्यान, वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक देऊन उलटली. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी खोबा जंगलात घडली. यात कारमध्ये असलेल्या सहापैकी चार युवकांचा मृत्यू झाला तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
दरम्यान, हा प्रकार या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती डुग्गीपार व नवेगावबांध पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार संजय पांढरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चारही मृतक युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आले. या घटनेची नोंद डुग्गीपार व नवेगावबांध पोलिसांनी घेतली आहे.
अन् नवेगावबांध येथील काम ठरले शेवटचे
अपघातात ठार झालेले चार तरुण हे मित्र असून, ते एकत्रितपणे सौर पंप फिटिंगचे काम करीत असल्याचे बोलले जाते. नवेगावबांध येथे सौर पंप फिटिंग करण्यासाठी बुधवारी सकाळीच गेले होते. हे काम रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आटोपले. यानंतर ते त्यांच्या कारने आमगावकडे आपल्या गावी परतण्यासाठी निघाले. मात्र सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी जंगलात काळाने त्यांच्यावर घाला घातला.