गोंदिया : मागील आठवडाभरापासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गोंदियाच्या बाजारपेठेतसुद्धा टोमॅटो १२० ते १५० प्रतिकिलो विक्री केला जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भाजीपाल्याच्या यादीतून टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आहे. तर टोमॅटोच्या दराने सर्वांनाच चांगला घाम फोडला आहे. त्यामुळे चोरट्यांनीसुद्धा आपला मोर्चा इतर वस्तू चोरण्याऐवजी टोमॅटो चोरण्याकडे वळविला आहे. गोंदिया येथील भाजी बाजारातून चक्क २० क्रेट्स टोमॅटोची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली.
शहरातील भाजीबाजारात बबन ऊर्फ (बब्बू) गंगभोज यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. गुरुवारी त्यांनी त्यांच्या दुकानात २० क्रेट्स टोमॅटो खरेदी करून ठेवले होते. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गंगभोज यांचे दुकान फोडून २० क्रेट्स टाेमॅटो व इलेक्ट्राॅनिक वजन-काटा चोरून नेला. गंगभोज शुक्रवारी सकाळी आपले दुकान उघडण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी दुकानात पाहणी केली असता २० क्रेट्स टोमॅटो व इलेक्ट्रानिक वजनकाटा चोरीला गेल्याचे आढळले.
त्यांनी लगेच शहर पोलिस स्टेशन गाठून याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत गंगभोज यांच्या दुकाना शेजारील लागलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दरवाढीमुळे टोमॅटो देखील आता सुरक्षित राहिले नसल्याची चर्चा होऊ लागली आहे.
भाजीबाजारात चर्चेचा विषय
भाजीबाजारातील गंगभोज यांच्या दुकानात टोमॅटोची चोरी झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर भाजी बाजारात होती. तर टोमॅटोच्या दरवाढीमुळे आता चोरट्यांनीसुद्धा आपले लक्ष टोमॅटोवर केंद्रित केल्याची चर्चा शहरात रंगू लागली होती.