देवरी (गोंदिया) : दोन दिवसांपूर्वीच ग्राम बोरगाव येथील दोन घरांतील घरफोडीची घटना ताजी असतानाच शहरात आणखी दोन ठिकाणी चोरी झाल्याची घटना रविवारी (दि. २६) पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी याच चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारा उघड झाले आहे. या दोन चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी-आमगाव रोडवरील अग्रसेन चौकाजवळ असलेल्या महावीर राईस मिलचे तीन दरवाजे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी राॅडने टेबलवरचा गल्ला आणि लोखंडी अलमारीचे कुलूप तोडून चार लाख ३८ हजार रुपये चोरून नेले. पहाटे ५ वाजतादरम्यान ही घडली असून, त्या अगोदर या चोरट्यांनी नवाटोला येथील कृष्णा पंचमवार यांच्या घराचे कुलूप तोडून सहा हजार रुपये रोख व ८६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रात्रीपासून पहाटेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे, हे विशेष.
मागील महिन्यात त्रिमूर्तीनगर कॉलनीत भरदिवसा चोरट्यांनी चुटे यांच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्यानंतर दोन दिवस अगोदर देवरीपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम बोरगाव येथे दोन घरांतून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ताजी असतानाच रविवारी (दि. २६) पहाटे चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी करून पोलिसांना एक प्रकारचे चॅलेंज केले असून, चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावीर राईस मिलचे संचालक श्रेय जैन व यादव पंचमवार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, देवरी पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सडक-अर्जुनी व देवरीतील घटनांतील चोरटे एकच
- सीसीटीव्ही फुटेज नुसार रविवारी (दि. २६) पहाटे ३.३० वाजता दरम्यान चोरट्यांनी सडक अर्जुनी येथे डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेच्या चॅनल गेटचे कुलूप तोडले. दुसऱ्या दाराचे कुलूप तोडत असताना तिथे कार्यरत गार्डला बघताच चोरटे तिथून पसार झाले. त्यानंतर त्यांनी देवरी पासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाटोला येथील सुखसागर हॉटेल समोर आपली इंडिका विस्टा कार उभी ठेवून हॉटेलच्या मागे असलेल्या कृष्णा पंचमवार यांच्या बंद असलेल्या घरासमोरील दाराचे कुलूप तोडून चोरी केली. त्यानंतर त्यांनी येथे येऊन महावीर राईस मिलमध्ये चोरी करून छत्तीसगडकडे पसार झाले. या तिन्ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने या तिन्ही घटनांतील दोन्ही चोरटे हे एकच असल्याचे सिद्ध झाले आहे.