लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निवडणूक आयाेगाने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे छायाचित्र असणे अनिवार्य केले होते. यांतरगंत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांची यादी तयार करून मतदारांना छायाचित्र संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता तिन्ही मतदारसंघांतील १७१९१ मतदारांनी अद्यापही छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा केलेले नाही. त्यामुळे यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाचे २४ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला. १५ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १७१९१ छायाचित्र नसलेले मतदार असून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघांमधील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीतील सर्व नावासमोर संबंधित मतदाराचे छायाचित्र असणे अनिवार्य असल्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार छायाचित्र नसलेले मतदारांचे छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत गोळा करून मतदार यादीत अद्ययावत करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची छायाचित्र नसलेल्यांमध्ये तिरोडा मतदारसंघातील १६७२, गोंदिया विधानसभा मतदारसंघातील १४९४६, आमगाव मतदारसंघातील ५७३ अशा एकूण १७१९१ मतदारांची छायाचित्रे अद्यापही निवडणूक विभागाला प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांतील मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे अथवा नाही याची खात्री करून घ्यावी.
तहसील कार्यालयात जाऊन करा खात्री मतदार यादीची तपासणी करून आपल्या नावासोबत छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नावासोबत छायाचित्र नसल्यास त्वरित संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात ५ जुलैपर्यंत सादर करावे, अन्यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.