गोंदिया : मोबाईलच्या हव्यासापोटी आता जीव घेण्यापर्यंतची गोष्ट होऊ लागली आहे. मोबाईल घेण्यासाठी मित्राने आठ हजार रूपयाची मदत केली. परंतु त्याने पैसे परत मागितले असता एका बालकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या प्रकरणातील विधीसंघर्षीत बालकाला भंडारा येथून ताब्यात घेऊन तिरोड्यात आणले. तिरोडा येथील पवन रहांगडाले (२८) याचा मृतदेह १४ सप्टेंबर रोजी दुपारी बोदलकसा गावाजवळील एका जंगलामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. ३ सप्टेंबर रोजी पवन रहांगडाले (२८) याचा खून एका अल्पवयीन मुलाने केला होता.
विधीसंघर्ष बालकाने मृतक पवन याच्याकडून हप्त्यावर मोबाईल घेण्यासाठी उसणे पैसे घेतले होते. ते पैसे पवन विधीसंघर्ष बालकाकडे मागत होता. याचा राग मनात धरून त्याचा खून केला. पवनच्या खात्यामध्ये सात ते आठ हजार रुपये असतांनाही माझ्याकडे उसणे दिलेले पैसे मागतो हा राग त्याच्या मनात होता. यासाठी त्या विधीसंघर्षीत बालकाने ३ सप्टेंबर २०२२ रोजी पवनला बोलावून बोदलकसा डॅम जवळील जंगलात नेले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा मृतदेह झाडाच्या फांद्यामध्ये लपवून ठेवला. तो विधीसंघर्ष बालक तिरोडा तालुक्याच्या जमुनिया येथील राहणारा आहे. त्याच्यावर तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२,२०१ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवनचा मित्र असलेला विधिसंघर्ष बालक हा घटनेपासून फरार झाला होता. मृतदेह मिळाल्यानंतर तो छिंदवाड़ा इंदोर व उज्जैन मध्यप्रदेश या परिसरामध्ये लपत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस शिपाई केदार, पोलीस शिपाई शाम राठोड यांनी उज्जैन व व इंदोर राज्य मध्यप्रदेश येथे त्याचा शोध घेतला असता, तो भंडारा बस डेपो परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस उपनिरीक्षक विघ्ने, पोलीस शिपाई मानकर व पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सिद, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहाय्यक फौजदार गोपाल कापगते, पोलीस नायक रियाज शेख, पोलीस नायक सोमेंद्रसिंह तुरकर, पोलीस शिपाई संतोष केदार, श्याम राठोड, विजय मानकर, लक्ष्मण बंजार यांनी केली आहे.