गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३८ रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे तर २१ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहे. आतापर्यंत चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर २० रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या दरम्यान म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले ३८ तर संशयित २१ रुग्ण आढळले. यात ६९५ मधुमेह रुग्णांचा समावेश होता. याच रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहे. आरोग्य विभागाने संशयित रुग्णांना वेळीच उपचारासाठी नागपूर येथे रेफर केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजारावर कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे आता आरोग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांची तपासणी करीत आहे. त्यातच आता म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले रुग्ण पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे.
...........
ही आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे
म्युकरमायकोसिस नावाची काळी बुरशी जमिनीत खतांमध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यात तसेच हवेत अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकात आणि नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाकात त्रास होणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात हिरड्या दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दात हलणे, रक्ताची उलटी ही या आजाराची लक्षणे आहेत.
............
ही घ्या काळजी
रक्तातील साखरेची एचबीआयसीची चाचणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविड नंतर रक्तातील साखरेची पातळी याचे निरीक्षण, स्टेराॅईडचा अतिवापर टाळा, स्वत:च्या मनाने कुठलेही औषध घेऊ नका, घरी ऑक्सिजनचा वापर करीत असला तरी योग्य ती काळजी घ्या, निर्जंतुक पाण्याचा वापर करा, अँटिफंगलचा औषधांचा वापर करा, डॉक्टरांचा नियमित सल्ला घेत रहा.
...........
कोट
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे म्युकरमायकोसिसच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत १६ कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ३८ रुग्ण तर २१ संशयित रुग्ण आढळले. यापैकी काही रुग्णांना नागपूर येथे रेफर केले तर काही रुग्णांवर गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
- डाॅ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.