गोंदिया : गोरगरिबांच्या मुलांना खासगी नामवंत शाळेत २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा अमलात आणला. या कायद्यांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांच्या मुलांना आरटीईअंतर्गत प्रवेश देऊन त्याचा खर्च शासन सांभाळत आहे. परंतु अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव व तिरोडा या तीन तालुक्यांत आरटीईअंतर्गत एकही प्रवेश निश्चित झाला नाही.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ८५४ विद्यार्थ्यांची लॉटरी काढण्यात आली. परंतु ७ जुलैपर्यंत फक्त २२३ विद्यार्थ्यांचाच प्रवेश निश्चित झाला आहे. ६३२ विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनली प्रवेश घेतला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ९३ प्रवेश घ्यायचे होते; परंतु एकही प्रवेश निश्चित झाला नाही. आमगाव तालुक्यात ८३ प्रवेश घ्यायचे होते, तेथे १७ प्रवेश निश्चित झाले आहे. देवरी तालुक्यात ४१ प्रवेश घ्यायचे होते, तेथे २३ प्रवेश निश्चित झाले आहेत. गोंदिया तालुक्यात ३४८ प्रवेश घ्यायचे होते, तेथे १२४ प्रवेश निश्चित झाले आहेत. गोरेगाव तालुक्यात ७९ प्रवेश घ्यायचे होते, तेथे एकही प्रवेश निश्चित झाला नाही. सालेकसा तालुक्यात ४० प्रवेश घ्यायचे होते, तेथे ३२ प्रवेश निश्चित झाले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ४० प्रवेश घ्यायचे होते, तेथे २७ प्रवेश निश्चित झाले आहेत. तिरोडा तालुक्यात १३० प्रवेश घ्यायचे होते, तेथे परंतु एकही प्रवेश निश्चित झाला नाही.
........................................
९ जुलैपर्यंत मुदतवाढ
आरटीईच्या प्रवेशाला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनयमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाची मुदतवाढ करण्यात आली आहे. ही मुदतवाढ ९ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशामध्ये निवड यादीतील बालकांचे प्रवेश पालकांनी शाळेत जाऊन करण्याची मुदत ३० जूनपर्यंत देण्यात आली होती. परंतु या प्रवेशासाठी ओटीपीच्या तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन प्रवेशासाठी विलंब झाला. ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.