रस्त्यांवरील खड्डे जैसे थे : पालिका प्रशासनाची डोळेझाक, नागरिकांत मात्र खदखदतोय रोष कपिल केकत । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने शहरात कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध तर कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. उघड्यावर पडूनं असलेले हे खड्डे आता अपघाताला आमंत्रण देणारे ठरत असून या खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात घडत आहेत. मात्र या सर्व प्रकारांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगर पालिकेला शहरवासीयांच्या जीवांचे मौल नसल्याची ओरड शहरवासीयांकडून होत आहे. या खड्या चेंबरवर झाकण टाकणे किंवा त्यांना बुजविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र पालिका यातही कमकुवत ठरत आहे. यातून पालिकेला शहरवासीयांच्या जीवाशी काहीच घेणे देणे नसून त्यांना लोकांच्या जीवाचे काही मोलच नाही. शहरातील अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांच्या मधोमध किंवा रस्त्यांच्या कडेला उघडे खड्डे (चेंबर) सोडण्यात आले आहेत. याद्वारे नाल्यांची सफाई केली जाते. सफाई झाल्यानंतर या खड्यांवर लगेच झाकण लावून त्यांना बंद करणे ही सुद्धा पालिकेची जबाबदारी आहे. जेणेकरून या खड्यांत पडून किंवा खड्यांमुळे अपघात घडू नये. मात्र गोंदिया शहरातील स्थिती या विपरीत आहे. शहरात सोडण्यात आलेले खड्डे उघडेच दिसून येत आहेत. या खड्यांवर त्यांचे झाकण लावण्याचे साधे सौजन्य दाखविण्यासाठी पालिकेकडे वेळ नसल्याचे दिसते. एरवी ठिक आहे मात्र सध्या पावसाळा सुरू आहे. शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचते. पावसाच्या पाण्यात हे खड्डे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दिसत नाही. अशात हा प्रकार एखाद्याच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या खड्यांमुळे कित्येक अपघातही घडले आहेत. यामुळे या खड्यांची त्वरीत व्यवस्था करण्याची मागणी शहरवासी करीत आहेत. मात्र पालिका निद्रीस्त अवस्थेत असल्याने खड्डे तसेच उघड्यावर पडून आहेत. यातून पालिका या खड्यांत अपघात घडून लोकांच्या जीवावर बेतण्याची वाट बघत असावी अशा प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करीत आहेत. शहरातील कुठल्याही रस्त्यावर गेल्यास तिथे खड्डे न आढळल्यास आश्चर्य मानावे लागेल. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालक व रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्यावर खड्डे दाखवा स्पर्धासध्या नगरपालिकेत सत्तेवर नसताना शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची दखल घेत तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर आरोप केला होता. तसेच खड्डे दाखवून देण्यासाठी रस्त्यावरील खड्डे दाखवा अशी स्पर्धा घेतली होती. मात्र आता तेच सत्तेत असून त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
शहरवासीयांच्या जीवाचे मोलच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:47 AM