गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ही बाब लक्षात घेत मजिप्राने यंदाही पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण केले होते. मात्र, मागील वर्षी चांगलाच पाऊस झाल्याने यंदाही मजिप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची अद्याप तरी पाळी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मागील वर्षाप्रमाणे पुजारीटोलाचे पाणी न घेताच निघणार असल्याचे वाटते.
जिल्ह्यात पाऊस कमी बरसला तर पाणीटंचाई जाणवत असून पाण्यासाठी भटकंती सुरू होते. अशात गोंदिया शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पंचाईत होते. गोंदिया शहराला मजिप्राच्या माध्यमातून डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. कमी पाऊस झाल्यास नदी आटली तर त्याचा परिणाम गोंदिया शहरातील पाणी पुरवठ्यावर होतो. यावर तोडगा म्हणून सन २०१७-१८ मध्ये गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असता मजिप्राने पुजारीटोलाचे पाणी वैनगंगा नदीत सोडून शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढला होता.
त्यानंतर, शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बघता मजिप्राकडून दरवर्षी पुजारीटोला प्रकल्पात पाण्याचे आरक्षण केले जाते. त्यानुसार, यंदाही मजिप्राने पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे आतापर्यंत शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली दिसत नाही. म्हणूनच मजिप्राने पुजारीटोली प्रकल्पातील पाण्यासाठी बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाकडे पाण्याची डिमांड दिली नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आता मान्सून काही दिवसांवर आला असून सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिली तर यंदाचा उन्हाळा असाच निघून जाणार व पुजारीटोलातील पाणी आणण्याची गरज पडणार नाही.
------------------------------
२०१८-१९ मध्ये आणले होते पाणी
गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने मजिप्राला सन २०१८ व २०१९ मध्ये पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. म्हणजेच, सन २०१८ पासूनच या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सन २०२० मध्येही पाणी आणण्याची गरज पडली नव्हती. तर यंदा सध्या तरी तशी गरज दिसत नसल्याने यंदाही पाणी आणावे लागणार की नाही हे काही दिवसांत समजणार आहे.
--------------------------
पुजारीटोला प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा
उन्हाळा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात असून येत्या ७ जूनपासून मान्सून सुरू होणार आहे. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. शिवाय दररोजची स्थिती बघता कधीही पाऊस बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही यंदा पुजारीटोला प्रकल्पात ५०.६४ टक्के पाणीसाठा दिसत आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घेता येईल.