शिक्षणाच्या वेळेत प्रेमाचे भूत : शिकवणीला गेलेल्या मुली प्रियकरासोबत फरार नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सद्यस्थितीत सुरू असलेल्या परिस्थितीवरच सैराट या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील १८ वर्षाखालील असलेल्या ८६ मुलींनी मागील दीड वर्षात सैराटच्या नायिकेप्रमाणे भूमिका अदा केली. आई-वडील त्या मुला-मुलींना आदर्श नागरिक घडविण्याचे स्वप्न रंगवत असताना त्यांनी आईवडिलांच्या अपेक्षेवर पाणी फेरून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले. सर्वच साधने सहजरीत्या उपलब्ध झाल्याने आता कोवळ्या वयातच प्रेमाचे आकर्षण वाटू लागते. आई-वडील आपल्या पाल्यांच्या हव्यासापोटी त्यांना पाहिजे ते साधने उपलब्ध करून देतात. शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडे मोबाईल दिला जातो. त्यामुळे ते मोबाईलच्या माध्यमातून सतत एकमेकाच्या संपर्कात राहतात. त्यातूनच त्यांचे प्रेम फुलते. आईवडिलांनी हट्ट पुरविण्यासाठी दिलेल्या मोबाईलचा त् विपरीत परिणाम होऊन आपले प्रेम फुलविण्यासाठी या मोबाईलचा अधिक वापर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रेमाचे आमिष देत तरूणींचे लैंगिक शोषण करण्याचेही प्रमाण मोठे आहे. वर्षाकाठी १०० च्या घरात लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचे प्रकरणे जिल्हा पोलिसांकडे दाखल केले जात आहेत. शेकडो प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचतच नाही. अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून प्रेमाच्या नाट्यातून त्यांचे लैंगिक शोषण करणारे कमी नाही. वर्ष दोन वर्ष प्रेमाच्या हाणाभाका केल्यावर त्या मुलींना वाऱ्यावर सोडण्याचेही प्रकार जिल्ह्यात झाले आहेत. मागील १७ महिन्याच्या काळात गोंदिया जिल्ह्यातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची माहिती घेतली असता सर्वात जास्त मुली गोंदिया शहरातून पळून गेल्या आहेत. ज्या मुली पळून गेल्या त्यातील बहुतांश शिकवणी वर्गाच्या नावावर घरातून बाहेर पडल्या होत्या. शिकवणी वर्गासाठी जाणाऱ्या मुली प्रियकरासोबत दररोज सायंकाळी किंवा सकाळीच भेटून आपल्या प्रेमकहाणीचा पुढचा पाढा शिकवणी वर्गाच्या नावावरच गिरवित होत्या. आईवडिलांनी याप्रकाराकडे केलेले दुर्लक्षही कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. ६२ मुलींना पळवून नेल्यानंतर सोडले ज्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नाही, अशांच्या नादी प्रौगंडावस्थेतील मुली लागतात. आपल्यासाठी आई-वडील किती कष्ट सोसतात याची किंचितही कल्पना न करता केवळ आकर्षणापोटी दोन शब्द गोड बोलणाऱ्या मुलाच्या नादी लागतात. आईवडिलांना सोडून त्या मुली प्रियकरासोबत फरार झाल्या आहेत. परंतु वडिलांच्या पैशावर प्रेयसीला काही दिवस खूश ठेवणारे मजनू मुलीला पळवून नेल्यानंतर लगेच त्यांना वास्तविकतेची जाण होते. त्यातून ते आपली जबाबदारी झटकून पळवून नेलेल्या मुलींना सोडून पसार होतात. मागील १७ महिन्यांच्या काळात प्रियकरासोबत पळून गेलेल्या ६२ मुलींना त्यांच्या प्रियकरांनी वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक मुली आईवडिलांकडे परतल्या आहेत. ३८ मुलींचा पत्ताच नाही प्रियकरासोबत पळून शहरात राहायला गेलेल्या ३८ मुली अद्याप परतल्या नाहीत. त्यांचा आईवडिलांशी संपर्कही झाला नाही. प्रियकराने प्रमाचे आमिष देऊन त्यांना पळवून नेले. परंतु त्याच्याकडे काहीच आर्थिक उत्पन्न नसल्याने अनेकांनी पळवून नेलेल्या मुलींना सोडून दिले. तर काही परतल्याच नाहीत. त्यांच्या प्रियकराने त्यांना परप्रांतात विक्री केले की त्यांचे काय झाले यासंदर्भात कुणालाच माहिती नाही. सन २०१६ या वर्षात ५१ अल्पवयीन मुली गोंदिया जिल्ह्यातून पसार झाल्या होत्या. त्यातील ४० मुलींना त्यांच्या प्रियकरांनी सोडून दिले. त्यातील १० मुली परतल्या नाहीत. २०१७ च्या आतापर्यंत २९ अल्पवयीन मुलींचा अपहरण झाल्याची नोंद जिल्हा पोलिसांकडे आहे. त्यातील ११ मुलींना त्यांच्या प्रियकरांनी सोडून दिले. तर १८ मुलींचा अजूनही पत्ताच नाही.
८६ अल्पवयीन मुली झाल्या सैराट
By admin | Published: May 21, 2017 1:42 AM