गोंदिया : रेल्वे प्रशासनाने तब्बल ११ महिन्यांनंतर सोमवारपासून (दि.२२) गोंदिया-दुर्ग आणि गोंदिया या दोन लोकल गाड्या सुरू केल्या आहेत, तर रिवा-इतवारी-जबलपूर ही एक्स्प्रेस गाडीही गोंदियामार्गे सुरू केली आहे. ११ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लोकल आणि एक्स्प्रेस गाडी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडीची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २५ मार्चपासून लोकलसह व सर्व एक्स्प्रेस गाड्याही बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर, जून महिन्यात काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या, पण रेल्वेची प्रवाशी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अजूनही एसटी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, एसटीचे तिकीट भाडे अधिक असल्याने गोरगरिबांच्या खिशाला त्याचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे कधी एकदाची रेल्वे वाहतूक सुरळीत होते, अशी आस प्रवाशांना लागली आहे. कोरोनाची परिस्थिती आता पूर्वपदावर येत असून, रेल्वे विभागानेही हळूहळू रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या गोंदिया-इतवारी, गोंदिया-दुर्ग आणि गोंदिया-बालाघाट, गोंदिया-कटंगी, गोंदिया-रायपूर आणि गोंदिया-बल्लारशा या पॅसेंजर गाड्या मागील अकरा महिन्यांपासून बंद असल्याने, अनेकांचा रोजगार बुडाला आहे. भाजीपाला, दूध विक्रेते आणि रोजगारासाठी दररोज नागपूरला जाणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रवाशांची ओरड वाढल्यानंतर रेल्वे विभागाने साेमवारपासून गोंदिया-दुर्ग आणि गोंदिया-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू केल्या, तर रिवा-इतवारी-जबलपूर ही एक्स्प्रेस गाडी सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल गाडी सुरू झाल्याने, रेल्वे स्थानकावरील रेलचेलही वाढल्याचे चित्र होते.
.......
गोंदिया-बल्लारशा गाडीची प्रतीक्षा कायम
रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वीच सर्वाधिक प्रवाशी संख्या असलेल्या लोकल रेल्वे गाड्यांची यादी गोंदिया रेल्वे स्थानक व्यवस्थापनाकडून मागविली होती. त्यात गोंदिया-बल्लारशा गाडीचाही समावेश होता. ही गाडीही सोमवारपासून सुरू होणार होती. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने, ही गाडी सुरू करण्याचा निर्णय काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहीती आहे. त्यामुळे या गाडीची प्रतीक्षा कायम आहे.
........
तिकीट दर झाले दुप्पट
कोरोना संसर्गाच्या कालावधीत रेल्वे विभागाने सोमवारपासून दोन लोकल आणि एक एक्स्प्रेस गाडी सुरू केली, पण या या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. गोंदिया-इतवारी या गाडीने पूर्वी गोंदिया इतवारी या प्रवाससाठी २५ रुपये मोजावे लागत होते. आता मात्र, यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता.
....